नाशिक : राज्यातील शैक्षणिक संस्थांना अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात सूचना दिली असतानाही या सूचनेचे योग्य पालन केले जात नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांसोबतच शैक्षणिक संस्थांच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नाशकातील शैक्षणिक संस्थांचे फायर ऑडिट कधी होणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता शाळा, महाविद्यालयांचे फायर ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नाशकातील पालकांकडून होत असून, भंडाऱ्यातील घटनेनंतर या मागणीने जोर धरला आहे. तामिळनाडूतील कुंभकोणममधील प्राथमिक शाळेला लागलेल्या आगीमध्ये होरपळून ९४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळांच्या फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेला आला. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर मुंबईतील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेली आग, सुरतमधील खासगी क्लासच्या आगीची दुर्घटनांमुळे शाळा, महाविद्यालयांमधील अग्निशमन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा, महाविद्यलयांमध्ये अग्निशमन सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने शैक्षणिक संस्थांनी शाळांच्या इमारतींचे फायर ऑडिट करून आवश्यक त्या सुरक्षा यंत्रणा अद्ययावत व कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
कोट-१
नाशिकमधील केवळ ४२ शाळांनीच आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यातील केवळ १७ शाळांनी नियमित नूतनीकरण व परीक्षण केल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. शहरातील अन्य शाळा व त्यांच्या आगप्रतिबंधात्मक यंत्रणेविषयी अग्निशमन विभागाकडे कोणतीही माहिती नाही. अग्निशमन विभागाकडून २०१३ पासून कोणतीही कारवाई झालेली नाही. आता भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेतून शहाणपण घेत शाळांचे फायर ऑडिट करण्याची गरज आहे.
-प्रदीप यादव, माहिती अधिकार जनजागृती समिती
कोट-
दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे अत्यावश्यक असून, शिक्षण विभागाने शाळांना मान्यता देतानाच यासंदर्भातील पडताळणी करून घेण्याची गरज आहे. शाळांनीही अशा अनपेक्षित दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणेचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करून त्याचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
- निलेश साळुंखे , अध्यक्ष, नाशिक पॅरेंट्स असोसिएशन