नाशिक : मुंबईकडून द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर गोविंदनगर परिसरात एकापाठोपाठ पाच अवजड ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे जखमी झाले. मंगळवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली.याबाबत अधिक माहिती अशी, पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिकमध्ये जाणारा ट्रक (सीजी०४ जेडी८२५१) गोविंदनगरजवळ उड्डाणपूलावर नादुरूस्त झाला. यामुळे चालकाने उड्डाणपुलावर रस्त्यालगत ट्रक उभा करत दुरूस्तीसाठी चाचपणी सुरु केली. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने त्याचा ट्रक (एमपी०९ एचएच५०१६) हा नादुरूस्त ट्रकवर जाऊन आदळला. दरम्यान, त्याच्या पाठीमागे असलेल्या ट्रकचालकाची भंबेरी उडाल्याने त्याच्या ताब्यातील कंटेनर (एम.एच ४३ बीपी ६३५५) समोरील ट्रकवर जाऊन आदळला. त्याच्या पाठीमागून येत असलेला ट्रकदेखील या कंटेनरवर आदळला. त्यापाठोपाठ पाचवा ट्रक (एम.एच१८बीजी ७४९१) हादेखील पाठीमागून येत ट्रकवर वेगाने आदळला. या ट्रकमध्ये लोखंडी पत्र्याचा माल भरलेला होता. अपघातात दणका बसल्याने सर्व पत्रे हलले आणि चालकाच्या कॅबीनमध्ये पाठीमागून घुसले; मात्र लाकडी सीट भक्कम असल्याने चालक-क्लिनर बचावले. घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली.
काही मिनिटांतच लिडिंग फायरमन इकबाल शेख, फायरमन किशोर पाटील, तौसीफ शेख, विजय शिंदे, अनिल गांगुर्डे, बंबचालक शरद देटके हे घटनास्थली आवश्यक ती सर्व साधनसामुग्रीसह दाखल झाले. या जवानांनी वेळीच धाव घेत ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या चालक-वाहकाला दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरक्षितरित्या 'रेस्क्यू' केले. या दुर्घटनेत ट्रकचालक करण जमरे, क्लीनर कृष्णा कन्नोजे हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.अग्नीशमन दलाचे जवान ठरले देवदूतघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वेळेत धाव घेतली. इलेक्ट्रीक हायड्रोलिक कटर, ट्रेडर, जॅक आदी साहित्याचा कुशलतेने वापर करत आपल्या अनुभवाच्या जोरावर जवानांनी ट्रकच्या चालकबाजूचा पत्रा कापून काढला.