जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना घटनेबाबत अवगत करून तालुका व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. घटनेनंतर काही वेळातच उपविभागीय अधिकारी सोपान कासार व तहसीलदार प्रमोद हिले बचाव पथकासह घटनास्थळी दाखल होऊन लगेचच मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात येऊन प्रशासन सोबत असल्याचा दिलासा नागरिकांना देण्यात आला. खरीखुरी अन अंगावर रोमांच उभे राहतील, अशी ही घटना घडल्याचे नागरिकांना कळताच त्यांच्याही मनात काहीवेळ भीतीचे वातावरण होते. मात्र, अचानकपणे उद्भभवलेल्या आपत्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी किती तत्पर आहे, याबद्दलची ही प्रात्यक्षिके असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.येवला शहरापासून सुमारे ३५ किमी दूर असलेल्या रहाडी येथे महसूल, अग्निशमन दल, पोलीस, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग आदींसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अवघ्या ४० मिनिटात घटनस्थळी पोहोचून कार्यरत झाल्या. दरम्यान, संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर अग्निशमन दल येवला, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. याप्रसंगी येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार, नाशिक ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदुरकर, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगले, तालुका आरोग्य अधिकारी नेहते, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांसाठी हजर होते.----------------------नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत शासकीय यंत्रणेची धावपळ होऊ नये व नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळली जावी, यासाठी रहाडी येथे झालेली रंगीत तालीम अत्यंत महत्त्वाची व गरजेची होती. ऐन वेळी उपस्थित ग्रामस्थ व स्वयंसेवकांना आवश्यक मार्गदर्शन व अशा परिस्थितीत करावयाची कामे याची माहिती त्यांना मिळणे गरजेचे होते. ते या माध्यमातून त्यांना योग्यरित्या समजले.- राजू काळे, तलाठी, रहाडी
रहाडी गावात सकाळी ढगफुटी होते तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:15 PM