नाशिक : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची क्षमता वाढविण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेऊनही त्याचे काम तसूभरही पुढे सरकलेले नाही, उलट सदर प्रकल्पाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्नच केला जात असल्याने प्रस्तावित ६६० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार? असा सवाल कामगार करीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांकडून पुन्हा या मुद्द्याला हवा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक औष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉटचे ३ संच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असूनही तीनही संचातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. टप्पा एकमधील १४० मेगावॉटची क्षमता असलेले २ संच कालमर्यादा संपल्याने ते २०१० मध्ये बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी या ठिकाणी ६६० मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता असलेले संच उभारण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेण्यात आला, परंतु पुढे काहीच होऊ शकलेले नाही. उलट शासनाने कोराडी येथे ६६० मेगावॉटचे दोन संच उभारण्याचे ठरविले आहे. कोराडीच्या प्रकल्पामुळे वायू प्रदूषणात भर पडण्याची शक्यता व्यक्त करून सुमारे ३५ संघटनांनी या संचास विरोध दर्शविला आहे.विदर्भात सहाहून अधिक महानिर्मितीसह खासगी वीज प्रकल्प कार्यान्वित आहेत. कोराडी येथे अगोदरच २४०० मेगावॉट क्षमतेचे संच आहेत, तरीही अजून तिथे नवीन दोन संचांचा अट्टाहास धरला जात असताना एकलहरे येथे मंजूर प्रकल्पाच्या कामकाजाबाबत चालढकल केली जात आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करावे यासाठी प्रकल्प बचाव समितीने मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पालकमंत्री, महानिर्मितीच्या मुख्य कार्यालयात पाठपुरावा सुरू ठेवला असून, त्याला अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळत नसल्याने स्थानिक नागरिक, प्रकल्पाचे कामगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.आमची कंपनी गेल्या २० वर्षांपासून राखेवर प्रक्रिया करते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात राखेचा वापर होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. या व्यवसायामुळे कंपनीत ५५० ते ६०० लोकांना रोजगार मिळालेला आहे. एकलहरे येथे नवीन ६६० मेगावॉटचा प्रकल्प आला तर लोकांचा रोजगार टिकून राहील.- रणजित वर्मा, युनिट हेड, डर्क इंडिया कंपनी
एकलहरे वीज प्रकल्पाची मुहूर्तमेढ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:04 AM