नाशिक : मनुष्यप्राणी आपले आयुष्य एखाद्या तरी व्यक्तीच्या साथीने जगत असतो. आयुष्य जगताना चांगल्या माणसांची साथ लाभल्यास आयुष्यामधील चढ-उतार सहजरित्या पार होतात; जेव्हा अशी मोलाची साथ सुटते तेव्हा त्याचा त्रासही जाणवतो; मात्र २४ तास आपल्या साथीने चालणारी सावली जेव्हा साथ सोडते तेव्हा.... हो, असाच रोमांचकारी अनुभव नाशिकककरांनाही रविवारी आला.आपल्या दिनचर्येनुसार घराबाहेर पडलेल्या नागरिकांना चक्क रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपली सावलीच जमिनीवर पडत नसल्याचे लक्षात आले आणि त्यांनाही क्षणभर धक्का बसला. सावली नेमकी कुठे गेली? सावली दिसत का नाही? प्रखर उन्हातही सावली गायब? आजुबाजुच्या दुकानांची वाहनांची सावली दिसते? आपली का दिसत नाही? अशा विविध प्रश्नांचे कोलाहल मनात निर्माण झाले. हा अद्भूत अविष्कार खगोलीय घटनेचा असल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुर्य नाशिकच्या अक्षांशच्या मध्यावर असल्यामुळे सुर्यकिरणे थेट डोक्यावर पडू लागल्याने सावली नाशिक करांच्या पायाजवळ पडली तर काही वेळाने ती सावलीही अदृश्य झाल्याचा अनुभव नागरिकांना आला.
या वेळेत सावलीने सोडली साथ...दुपारी बारा वाजता प्रखर ऊन जाणवत होते. सव्वा बारा वाजेपर्यंत सावली जवळ दिसत होती; मात्र घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांना समांतर झाले आणि १२ वाजून ३० मिनिटाला सावली एकदमच अदृश्य झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. जवळ पडणारी सावलीही दिसेनाशी झाल्यामुळे सावलीला शोध कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला. दुपारी एक वाजेपर्यंत सुर्यकिरणे थेट डोक्यावर पडत असल्यामुळे सावली गायब झाली होती. सुर्य डोक्यावर आल्यामुळे सावलीने तब्बल नाशिककारांची अर्धा तास साथ सोडली.
सावली का झाली गायब?पृथ्वीची परिक्रमा सूर्याभोवती सुरू असते; मात्र तिचा अक्ष हा परिक्रमेच्या कक्षास लंब स्वरूपात नसतो. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन घडते. दररोज क्षितिजावरची सूर्याची जागा (सूर्योदय-सूर्यास्त) बदलत असते. २३ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत सूर्याचे उत्तरायण सुरू राहणार आहे. यंदाचा शून्य सावलीचा दिवस हा उत्तरायण प्रवासामधील असून, पुढील सहा महिन्यांनंतर जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होईल, तेव्हा पुन्हा असा दिवस अनुुभवयास येण्याची शक्यता आहे. नाशिकचा अक्षांश वीस अंश इतका असल्याने सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी व त्यानुसार सूर्य मध्यावर येण्याचा दिवस प्रत्येक शहरात वेगवेगळा असू शकतो. त्यानुसार नाशिकमध्ये रविवारी हा रोमांचकारी अनुभव नागरिकांना घेता आला.