शहरात शस्त्रांचा धाक दाखवून लुटमारीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सर्वच गुन्हे शाखांना विनापरवाना शस्त्रे घेऊन मिरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यासाठी मोहीम हाती घेण्याची सूचना केली आहे. यानुसार गुन्हे शाखा युनिट-१, युनिट-२ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखांचे गस्तीपथके सक्रिय झाली आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर भागात अशाच एका दुचाकीस्वाराकडून धारधार शस्त्रे युनिट-१च्या पथकाने जप्त केली होती. मध्यवर्ती गुन्हे शाखेतील हवालदार गंगाधर केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक निरीक्षक कुंदन सोनोने, धर्मराज बांगर यांच्या पथकाने टाकळीरोड येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद बुलेट (एमएच १५ एफझेड २३२८) आली असता पोलिसांनी ती अडविली. या बुलेटची तपासणी केली असता पोलिसांना मागील बाजूस सीटच्या उजव्या बाजूने एका बॅनरमध्ये दोन धारधार तलवारी गुंडाळून बांधण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी सिद्धेशविरुद्ध पोलीस आयुक्तालय हद्दीत विनापरवाना शस्त्र बाळगणे आदेशाचे उल्लंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...जेव्हा बुलेटच्या सीटखाली सापडतात तलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:10 AM