नाशिक : येथील त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या आवारात तिघे आधुनिक बंदूकधारी दहशतवादी घुसखोरी करत अंधाधुंद गोळीबार सुरू करतात... अकादमीत एकच धावपळ उडते... पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी खणखणतो... शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवान घटनास्थळी दाखल होतात अन सुरु होते. त्या दहशतवाद्यांना शोधून कंठस्नान घालण्याची मोहीम. दीड तासांच्या अथक परिश्रम आणि समोरासमोर झालेल्या चकमकीत तिघे अतिरेकी ठार करण्यास नाशिक पोलिसांना यश येते. दरम्यान, सुरक्षा व खबरदारीच्या दृष्टीने ही केवळ एक रंगीत तालीम (मॉक ड्रिल) होती, असे जाहीर करताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
नाशिक शहर पोलिसांनी शनिवारी (दि. ६) रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास हे मॉकड्रिल घेतले. या रंगीत तालमीचे निरीक्षण दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केले. यावेळी पोलिसांच्या आपत्कालीन घटनेला सामोरे जाताना मोहिमेत राहिलेल्या त्रुटी तसेच काही खबरदारी याबाबत झालेले दुर्लक्ष याबाबत पांडेय यांनी विविध सूचना देत मार्गदर्शन केले.
यावेळी उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले, सर्व सहायक आयुक्त तसेच सरकारवाडा, सातपूर, गंगापूर, मुबई नाका, भद्रकाली, अंबड या पोलीस ठाण्यांच्या अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरातसुद्धा अशा प्रकारे मॉकड्रिल घेण्यात आले होते.