नाशिक : देशात कोरोना सेवेत अग्रभागी असलेल्या आरोग्य व अन्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. हे लसीकरण सुरू असतानाच आता तिसऱ्या टप्प्यात १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण सुरु झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६ लाख ७२ हजार १६७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, १ लाख ९९ हजार ९५१ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यात लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील तरुणवर्गाचा अत्यल्प समावेश आहे. जिल्ह्यात केवळ १४ हजार ३१३ तरुणांनी पहिला डोस घेतला असून, अवघ्या १२३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे कटुंबातील तरुणांच्या लसीकरणाविषयी घरातील ज्येष्ठांना चिंता लागली आहे. कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय कारणाने असो अथवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने तरुणवर्गच अधिक प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील संसर्गाचा धोकाही साहजिकच अधिक आहे. त्यामुळे तरुणांच्या लसीकरणालाही गती देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील पालकवर्गाकडून होत आहे.
---
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
वयोगट पहिला डोस - दुसरा डोस
आरोग्य व अन्य कर्मचारी - १२९६२९ - ६०२३२
ज्येष्ठ -२४४७८९ - ७५९३९
४५ ते ६० - २८३४३६ - ६३६५७
१८ ते ४४ - १४३१३ - १२३
---
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी
घरातील तरुण मुलांना कामासाठी घराबाहेर पडावे लागते. तसेच घरातील कोणत्याही सदस्याला आरोग्यविषयक समस्या उद्भवली तर हीच तरुण मुले त्यांची औषधे आणण्यासाठी अथवा त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असल्याने तरुणांचे लसीकरणही लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
- विलास पवार, नाशिक रोड
----
अजूनही ज्येष्ठ नागरिकांसोबतच ४५ ते ६० वयोगटातील नागरिक लसीसाठी रांगेत आहेत. तरुणांचे लसीकरण तर चक्क बंद करण्यात आले आहे. तरुणच कामानिमित्त घराबाहेर अधिक पडत असल्याने त्यांना संसर्गाचा अधिक धोका असताना त्यांचे लसीकरण बंद करणे योग्य नाही. उलट लसींचा पुरवठा वाढवून तरुणांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे.
- राजेश जाधव, इंदिरानगर
------
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना बाधा होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची, संगोपनाची जबाबदारी ही तरुणांवरच असल्याने त्यांच्यासमोर घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत त्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे आवश्यक असून, तरुणांसाठी सरकारने लसींचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- अशोक ढेरींगे, नाशिक रोड.