लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे.
दिंडोरी तालुक्यात सध्या गहू, हरभरा तसेच कांदा लागवड चालू असल्यामुळे बळीराजाची धावपळ चालू असताना महावितरण कंपनीने कृषीपंपांना रात्रीचा वीजपुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय केली आहे. त्यात रात्री विजेचा बिघाड झाल्यास तो दिवसही वाया जातो. त्याप्रमाणे ट्रान्स्फॉर्मरवर डीओ व फ्यूज वारंवार जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात कायमच अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यांची दखल वनविभाग घेत नाही, त्यात सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे मोठे संकट आहे. रात्री पिकाला पाणी दिले नाही. तर पीक वाया जाण्याची भीती आणि रात्री बाहेर निघायचे तर बिबट्याची भीती असे दुहेरी संकट बळीराजापुढे उभे राहिले आहे.सध्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना तीन दिवस दिवसा, तर चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीने ठप्प असताना आजही शेतकरी आपल्या शेतात राबत आहे. याची दखल कुठे तरी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.दिवसाही शेतात काम करायचे व रात्री पिकांना पाणी द्यायचे त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेकांना व्याधींनी त्याला ग्रस्त केले आहे. अशी परिस्थिती असताना बळीराजाला कुणी वाली राहिलेला नाही, अशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.