इंदिरानगर - मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा पडला असून त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे.इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यासह परिसरातील विविध उपनगरातील नागरिकांना शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी समांतर रस्त्यावरून महामार्ग बसस्थानक मार्गे ये जा करावी लागते. महामार्ग बसस्थानकावरून नगर, मुंबई, कसारा, शिर्डी, सिन्नर, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा यासह विविध शहरांना गावाला दररोज बसेस ये जा करीत असतात. त्यामुळे महामार्ग बसस्थानक लगतच्या रस्त्यावर दिवसभर मोठयÞा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते परंतु महामार्ग बसस्थानका लगतच्या रस्त्यावरच तीन ते चार खासगी बसेस आणि चार ते पाच खासगी वाहने प्रवासी घेण्यासाठी तासनतास रस्त्यावरच उभी राहात असतात. त्यामुळे रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. खासगी प्रवासी वाहने नियमाची पायमल्ली करीत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.