एकलहरे : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करावे या मागणीसाठी प्रकल्प बचाव समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले होते. मात्र अद्यापही भेटीला मूहूर्त लागलेला नाही. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार योगेश घोलप, प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, प्रकाश म्हस्के, निवृत्ती चाफळकर, राजाराम धनवटे, विशाल संगमनेरे, बाळासाहेब म्हस्के आदींसह युनियन प्रतिनिधी, परिसरातील सरपंच, सोसायटीचे चेअरमन, नागरिक व कामगार उपस्थित होते.यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नाशिकचे दोन्ही खासदार व पंधरा आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकलहरे प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी साकडे घालावयाचे ठरले होते. मात्र या बैठकीला दोन महिने उलटून गेले तरी अजूनही मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा मुहूर्त लागत नाही. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी प्रकल्प बचाव समितीचे शिष्टमंडळ कधी जाणार याची प्रतीक्षा येथील कामगार, ठेकेदार, व्यापारी व परिसरातील रहिवासी करीत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एकलहरे प्रकल्पाबाबत परिस्थिती समजावून सांगून सकारात्मक निर्णय घेण्यास सांगावे, अशी मागणी कामगार, अभियंते, नागरिकांनी केली आहे.
एकलहरे प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:21 AM