सारांशसर्वांत जुनी राजकीय मैत्री म्हणून मध्यंतरी तुटलेली ‘युती’ जुळविण्यात अखेर यश आले असले तरी, वरिष्ठ नेत्यांचे जितके सहजपणे मनोमीलन झाले तितके वा तसे ते स्थानिक पातळीवर हमरीतुमरीने पेटलेल्या आणि निवडणूक लढण्याच्या अपेक्षित संधीने भारलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांत घडून येणे शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपेयी कधी रणांगणात उतरणार याबद्दल उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक आहे.शेंडी तुटो वा पारंबी ‘युती’ होणार नाहीच, अशा वल्गना यापूर्वी केल्या गेल्याने भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांतील इच्छुकांना ठिकठिकाणच्या उमेदवाऱ्या खुणावत होत्या. लोकसभा व विधानसभेच्या दृष्टीने काहीजण तयारीलाही लागले होते, परंतु नाही नाही म्हणत ‘युती’ झाल्याने अशांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. ‘युती’ होणारच असा कयास बांधून व दिंडोरीची जागा विद्यमान खासदारांच्या पक्षालाच जाईल हे ताडून धनराज महाले यांनी अचूकवेळी पक्षांतर करून राष्ट्रवादी गाठली; पण इतरांना तसे जमलेले नाही. त्यामुळे आता ‘युती’ची घोषणा झाल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.नाशिक लोकसभा जागेच्या दृष्टीने भाजपातर्फे अॅड. माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर होते. पण आता केलेली तयारी सोडून ज्यांच्या विरोधात लढायचे होते, त्या शिवसेनेच्या संभाव्य हेमंत गोडसे यांच्याच प्रचाराला बाहेर पडावे लागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ घातली आहे. म्हणजे येथे नाशकात ही अडचण, तर तिकडे सिन्नरमध्ये आमदारकीच्या प्रचारात राजाभाऊ वाजे यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे, हा त्यापेक्षा अवघड प्रश्न कोकाटे यांच्यापुढे आहे. परिणामी स्वभाव व निर्णयात सडेतोडपणा ठेवणारे कोकाटे ही राजकीय घुसमट सहन करू शकतील, याबाबत शंका बाळगली जाणे गैर ठरू नये.महत्त्वाचे म्हणजे, केंद्रात भाजपाचे सरकार हवे म्हणून नाशकात भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेला प्रामाणिकपणे मदत करतीलही; परंतु दिंडोरीत भाजपासाठी सेना तसे करेल का? कारण, मुळात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची संधी गेली ही एक बाब आहेच, शिवाय भाजपाच्या विद्यमान खासदारांनी आपल्याशी फारसे सख्य ठेवल्याची शिवसैनिकांची भावना नसल्याचाही मुद्दा आहे. अशात भाजपाने ज्यापद्धतीने शिवसेनेला झुंजविले व वेळोवेळी कमी लेखले त्याचा सुप्त राग म्हणून शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या उमेदवाराला मदत घडून येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.विधानसभेच्या निवडणुकीतील ‘युती’बाबतच्या संभाव्य परिणामांची चर्चा करायची, तर नाशकातीलच भाजपाच्या तिघा विद्यमान आमदारांना शिवसेनेची प्रामाणिक मदत होण्याची अपेक्षाच धरता येऊ नये. मध्य नाशिक, सिडको-सातपूर मतदारसंघात शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची तयारी स्पष्टपणे दिसून येत होती, ते मनाला मुरड घालून भाजपाचा प्रचार करणे कठीण आहे. नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपाला नेहमी आडवी जाणारी शिवसेना आता त्यांच्यासाठी ‘दक्ष’ होणे अवघड आहे. सिडकोत तर शिवसेनेतच इच्छुकांची संख्या मोठी आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे अशी काही नावे आहेत जी ऐनवेळी आपल्यातील स्पर्धा विसरून भाजपासाठी प्रचार करतील का? तसेच नाशिक मध्यमध्ये अजय बोरस्तेंकडून फरांदे यांच्या प्रचाराची अपेक्षा करता येऊ नये. गेल्यावेळी सर्वच परस्परांविरोधात लढलेले असल्याने त्यांच्यात मनोमीलन घडून येणे म्हणजे निवडुंगावर फूल उमलण्यासारखे ठरेल.मुळात शिवसेना नेत्यांनी ज्या आक्रमक व विखारीपणे भाजपावर तोफा डागल्या आहेत ते पाहता भाजपातील फळीही खूप काही प्रेमाने, झाले गेले विसरून कामाला लागेल, असे नाही. पण त्यांना दिल्ली हवी असल्याने ते अपमान व अवमान गिळतीलही. मात्र शिवसेनेचे काय? युतीची घोषणा झाली असली तरी स्थानिक पातळीवर तसे चित्र दिसून येण्याबाबत शंका घेतली जाणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे.
गोडसे यांच्या प्रचाराला कोकाटे कधी निघणार?
By किरण अग्रवाल | Published: February 23, 2019 11:26 PM
शिवसेनेने स्वबळाचा नारा सोडून देत भाजपासोबत युती केली असली, तरी स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात शड्डू ठोकून तयार बसलेल्यांत मनोमीलन घडून येणे म्हणावे तितके सहज सोपे नाही. यातही लोकसभा निवडणुकीत एकवेळ जमून जाईलही कारण तेथे इच्छुक कमी आहेत, परंतु विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तेथे काय?
ठळक मुद्दे मध्यंतरी तुटलेली ‘युती’ जुळविण्यात अखेर यश आले पक्षांतील इच्छुकांना ठिकठिकाणच्या उमेदवाऱ्या खुणावत होत्या.दिंडोरीत भाजपासाठी सेना तसे करेल का?