इंदिरानगर : नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. पुराचे घरात पाणी शिरणे हे जणू काही गणित झाले आहे. यंदा तर कहर झाला महापूर आला आणि नदीकाठच्या अनेक घरांत पाणी दोन-तीन दिवस साचून राहिले. त्यामुळे काही घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तू वाहून गेले. त्याचप्रमाणे झोपड्यादेखील महापुरात वाहून गेल्या.नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी परिसरात पडझड झाल्यानंतर नागरिकांनीच घराची तात्पुरती डागडुजी करून घेतली आहे. परंतु अद्याप मदत मिळालेली नाही. शिवाजीवाडी पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार नदीकाठी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे नासर्डी नदीस पूर येऊन नदीकाठच्या सुमारे ८० घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे गॅस सिलिंडर, कपडेसह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात सुमारे शंभर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. काहीजण आपल्या नातेवाइकांच्या घरी रात्र काढली घराची पडझड झाली. काही नागरिकांनी घरांची डागडुजी करून घेतली पंचनामे झाले असून, मदत या मिळणार तोपर्यंत आम्ही कसा उदरनिर्वाह करायचा? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. शिवाजीवाडी पूरग्रस्तांना प्रतिकूल परिस्थितीत रोजीरोटीसाठी व रोजगारासाठी कामावर जावे लागत आहे. पूरग्रस्तांना संसाराची शून्यातून पुन्हा सुरु वात करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस अडचणीला सामोरे जावे लागत आहे.पंधरा वर्षांपासून शिवाजी वाडीत राहतो नदीला आलेल्या पुरात कपडे संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. घरात दोन दिवस असलेल्या पाण्यामुळे पूर्ण ओलावा आला आहे.- पुष्पा धुळेघरात पुराचे पाणी शिरले घरातील सर्व सामान टाकून कुटुंबासह स्थलांतरित झालो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा घरात आलो, परंतु सगळं संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने होत्याचे नव्हते झाले.- राजू पालवेसकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नासर्डी नदीचे पाणी घरात शिरल्याने कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आहे त्याच परिस्थितीत घर सोडल्याने होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. पुन्हा सावरण्यासाठी मदत करावी.- संगीता पोटिंदेपंचनामे झाले परंतु मदत काय मिळणार आणि आम्ही संसाराला सुरु वात कशी करणार? असा प्रश्न आमच्यापुढे आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.- मंजुळा पालवेपुराचे पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या. त्यामुळे आता एक एक वस्तू जमा करावी लागत आहे. शासनाची मदत केव्हा मिळेल आणि आमची संसाराची घडी केव्हा बसेल.- सोनी गुंबाडे
पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:34 AM