इंदिरानगर : शहरातील सर्वांत जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षांपासून गंभीर बनत चालला आहे. एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात जनावरांचे गोठे स्थलांतरित करण्याच्या आदेश देण्यात आला होता; परंतु तेव्हाही केवळ नोटीस वाटप करण्याचाच सोपस्कार करण्यात आला होता. जनावरांचे गोठे हलविण्यास तेव्हाही मुहूर्त लागला नाही. आताही स्थायी समितीत या विषयावर चर्चा झाली आणि सभापतींनी आदेशही दिला. मात्र, गोठे खरोखरच हटतील काय, या विषयावर शंका आहे.
जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वडाळा गाव रस्ता व वडाळा गावातील लोकवस्तीत जनावरांचे गोठे हाेते. महापालिकेच्या कारवाईच्या इशाऱ्यावर काही प्रमाणात गोठे हटविण्यात आले. मात्र, बहुतांश गोठे ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला माणसांपेक्षा जनावरे महत्त्वाचे असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या वतीने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पार पाडला जातो.
वडाळागावात जिनतनगर, मेहबूबनगर, अण्णाभाऊ साठेनगर, मुमताजनगर, गुलशननगर यासह रहिवासी परिसर असून, सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले वडाळा गाव आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत आहे. जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारक जनावरांचे मलमूत्र सर्रासपणे गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून देतात. त्यामुळे पिंगूळ बाग परिसरातील काही नागरिकांच्या घरात मलमूत्र शिरत आहे, तसेच मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिल्याने सदर नाला विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून जात असल्याने घाण आणि दुर्गंधी पसरली आहे, तसेच सध्या पाणी जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते. अनेक वेळेस समक्ष भेटून आणि निवेदन देऊनसुद्धा अद्यापि जनावरांचे गोठे हटवले जात नाहीत.
इन्फो..
आयुक्तांचे दौरे की रोड शो?
सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी वडाळा गावातील जनावरांच्या गोठ्यांच्या मलमूत्रामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या भागाची पाहणी केली होती. त्यानंतर अद्यापि परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने दौरे फक्त ‘रोड शाे’ ठरत आहेत.
इन्फो..
राजकीय विरोध
नाशिक शहरातील बहुतांश ठिकाणी गोठ्यांचा प्रश्न गंभीर आहे; परंतु काही राजकीय नेत्यांचे गोठे असल्याने दरवेळी याबाबत केवळ घोषणाच होते आणि गोठे हटविण्याचा विषय मागे पडतो. त्यामुळे आताही कार्यवाही होईल की नाही, याबाबत सांशकताच आहे.