इंदिरानगर : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही नंदिनी नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला नाही. त्यामुळे महापालिका दुर्घटना होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिक करीत असून, सालाबादप्रमाणे यंदाही महापालिका फक्त नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबई नाका ते शिवाजीवाडी दरम्यान, नंदिनी नदीचे पात्र दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे अरुंद होत चालले आहे. भारतनगर, शिवाजीवाडी व नंदिनीनगर या परिसरात सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याइतकी घरे आणि झोपड्या होत्या, परंतु शहरातून विविध भागातून अतिक्रमण विभागाने झोपड्या हटवल्या की त्या तातडीने या परिसरात वसल्या जाऊ लागल्याने आजमितील शेकडो झोपड्या नदीच्या दुतर्फा वसल्या आहेत.मनपाच्या सुमारे सहा एकर जागेतसुद्धा संपूर्णपणे झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. सिंहस्थापूर्वी वडाळा-पाथर्डी रस्ता ते भारतनगर या रस्त्याच्या दुतर्फा आणि रस्ता रुंदीकरण डांबरीकरणास अडथळा ठरणाºया सुमारे साडेसहाशे अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. सुमारे पाच ते सहा वर्षांपासून सर्रासपणे मुंबई नाका ते शिवाजीवाडी यादरम्यान असलेल्या नंदिनी नदीपात्रात सर्रासपणे ठिकठिकाणी भर टाकून घरे बांधण्याचा धडाका लागला असून, त्यामुळे नदीपात्र संकुचित झाले आहे.पावसाळ्यात नदीचे पाणी शिवाजीवाडी, भारतनगर या भागात शिरते त्यामुळे रोजंदारीवर काम करणाºया येथील रहिवाशांच्या संसारोपयोगी वस्तूंचे दरवर्षी नुकसान होते.महापालिकेच्या वतीने दरवर्षी नदीपात्रात घरे बांधणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातात, परंतु कार्यवाही मात्र होत नाही. त्यामुळे नदीपात्रात घरे बांधणाºयांचे धाडस दिवसागणिक वाढतच चालले आहे. काही दिवसांतच नदीपात्र दिसेनासे होते की काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.दलालांकडून जागेची विक्रीमहापालिकेच्या दुर्लक्षामुळे नंदिनी नदीच्या दुतर्फा काही दलालांनी नदीपात्राची जमीन स्वमालकीची समजून परस्पर घरे बांधण्यासाठी विक्री केली आहेत. या दलालांकडूनच अतिक्रमणधारकांना बळ दिले जात असून, जागा विक्रीबरोबरच या लोकांकडून घरे बांधून देण्याचेही कॉन्ट्रॅक्ट घेतले जात आहे. हजारो रुपये भावाने गुंठेवारीनुसार जमिनीचे भाव ठरत आहेत. नंदिनी नदीचे मुंबई नाका ते शिवाजीवाडी पात्र मोकळा श्वास घेणार की नाही ?