संजय पाठक, नाशिक- महापालिकेने यंदा प्रथमच आरोग्य वैद्यकिय विभागाासाठी पंधरा कोटी रूपयांचा घसघशीत निधी अंदाजपत्रकात धरला असताना दुसरीकडे न बदलणारी प्रशासकिय मानसिकता मात्र उणिवा अधिक अधोरेखीत करीत आहेत. त्यामुळे महापालिकेची आरोग्य व्यवस्था स्मार्ट कधी होणार असा प्रश्न आहे.
सिडकोत एका महिलेच्या प्रसुतिला मोरवाडी येथील रूग्णालयात नकार देण्यात आल्याने रस्त्यात या महिलेची प्रसुती झाली. नाशिकमध्ये ही पहिली घटना नाही. पंचवटीत फुले नगर येथे तीनेक वर्षांपूर्वीच अशीच घटना घडली होती. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नोटिसांच्या पलिकडे काहीच झाले नाही. सध्या तर कोरोनाचा संकट काळ सुरू आहे. सर्वसामान्य आणि गरीब रूग्णांना महापालिकेचाच आधार आहे. शासनाने कितीही कायदे नियम केले आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तुस्थितीदर्शक माहिती तत्काळ नागरीकांना कळण्याचा उपाय केला असला तरी प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही. अशावेळी आरोग्य यंत्रणेच्या एकेक उणिवा पुढे येत असल्याने या सर्व यंत्रणेचा उपयोग काय असा प्रश्न केला जात आहे.
सिडकोतील घटना घडत नाही तोच बिटको रूग्णालयात पंधरा व्हेंटीलेटर्स महिनाभरापासून केवळ २३ किलोची आॅक्सीजन टाकी उपलब्ध होत नाही म्हणून पडून असल्याचे उघड झाले. त्याच प्रमाणे डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात मृतदेह नातेवार्इंकाना देण्यासाठी देखील कर्मचारी उपलब्ध नसल्याने अखेरीस कुटूंबियांना पीपीई किट घालून मृतदेह बाहेर आणावा लागला. गेल्याच आठवड्यत कोरोना बाधीतांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन दिवसांची वेटीग असल्याचे उघड झाले. गॅस शवदाहीनी बंद पडल्याने हा प्रकार घडला. यांसदर्भात ओरड झाल्यानंतर हा विषय मार्गी लागला.नाशिक शहर स्मार्ट होतेय म्हणजेच भांडवली कामे वेगाने होत आहेत त्याविषयी दुमत नाही. मात्र, आता गरज आहे ती आरोग्यावर भर देण्याची! प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून त्यामुळेच महापालिकेची आरोग्य सेवा स्मार्ट कधी होणार हा प्रश्न आहे.