श्याम बागुल / नाशिकदरवर्षीच शेतकऱ्यांच्या व प्रसंगी खाणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढणा-या कांद्याने यंदा नाही म्हटले तरी, व्यापा-यांचीही काही दिवस झोप उडवली. ती यासाठी की, शेतक-यांच्या कांद्याला चांगला भाव दिला, पण शेतक-याकडून खरेदी केलेला हाच कांदा पुन्हा विक्रीसाठी परराज्यातील कांदा व्यापा-याकडे पाठविला तर त्याला खरेदीची रक्कम वजा जाता पाहिजे तितका नफा मिळेल का आणि मिळाला तरी सरकारची वक्रदृष्टी कमी होईल का यासह आणखी काही कळीच्या प्रश्नांमुळे व्यापा-यांना कधी नव्हे यंदा पहिल्यांदाच कांदा लिलावावर अघोषित बहिष्कार टाकावा लागला व त्यातून पुढे घडलेले कांदा पुराण जिल्हावासियांनी चालू आठवड्यात चांगलेच अनुभवले.
कांद्याचा प्रश्न हा यंदाच उपस्थित झाला आणि यापुढे कधी होणार नाही असे म्हणता येणार नाही. कांद्याला भाव न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतो आणि कांद्याने भाव खाल्ला तर देशाच्या संसदेत राजकारण्यांच्या गळ्यात कांद्याच्या माळा पडतात. अतिवृष्टी अथवा कमी पाऊस झाला तरी, कांदा उत्पादनावर परिणाम होतो. कांद्याचे कमी,जास्त उत्पादन झाले तर दरावर परिणाम हे चक्र ठरलेले आहे. या चक्रात कांदा उत्पादक, व्यापारी व ग्राहक अशी साखळी एकमेकांवर जशी अवलंबून आहे तसेच कांद्याची मागणी व गरजेनुसार पुरवठा या व्यवहारी बाजारपेठेचे गणित देखील तितकेच महत्वाचे आहे.
गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यात अवकाळी पावसानेही धुमाकूळ घातला. त्यामुळे गेल्या वर्षी उन्हाळ कांद्यावर त्याचा परिणाम झाला. शेतक-यांना दोन वेळा कांदा लागवड करावी लागली, नव्याने बि-बियाणे खरेदी करावे लागले व त्यातून त्यांचा उत्पादन खर्च वाढला. निसर्गाच्या वक्रदृष्टीने कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. शेतक-यांनी उन्हाळ कांद्याची बाजारपेठेच्या मागणीनुसार गेल्या पाच ते सहा महिन्यापासून साठवणूक करून ठेवली व गरज वाढताच तो विक्रीला काढला, त्यातून कांद्याला सर्वाधिक आठ हजार रूपयांपर्यंतचा दिलासादायक भाव मिळाला. प्रत्यक्ष ग्राहकाला हा कांदा शंभर रूपये दराने खरेदी करावा लागला हा भाग वेगळा. परंतु शेतक-यांना कोरोना महामारीचा बसलेला फटका भरून काढण्यासाठी कांद्याच्या दराने चांगला हात दिला. मागणी नुसार पुरवठा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होवू लागल्याने काही दिवस कांद्याचे दर स्थिर राहिले परंतु शेतक-याकडून आठ हजारापर्यंत खरेदी केलेला कांद्याची प्रतवारी वेगळी करणे, त्याचे पॅकींग करणे, वाहतुकीदारे तो परराज्यातील व्यापा-याला पाठविण्यात येणारा खर्च व नफा पाहता स्थानिक व्यापा-यांना परराज्यातील व्यापा-याकडून कांद्याला तितकासा भाव दिला जाईल का असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. व्यापारी हा कधीच आतबट्ट्याचा व्यवहार करीत नाही, म्हणूनच त्याची गणना व्यापारी म्हणून होत असते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-याला पाच ते आठ हजारापर्यंतचा विक्रमी दर देतांना त्यात व्यापा-याने त्याचे नफ्या-तोट्याचे गणित पाहीले नसेल असे म्हणता येणार नाही. दुसरीकडे कांदा उत्पादक शेतक-यांनीही चांगला भाव मिळतो म्हणून संयम राखत बाजाराच्या मागणीनुसार पुरवठा करून जास्तीचे दोन पैसे कमविण्याकडे लक्ष दिले. इतपत सारे काही ठीक होते. परंतु खुल्या बाजारात कांद्याने शंभरी गाठल्यानंतर त्याचा व्हायचा तोच राजकीय परिणाम झाला व कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. त्याच बरोबर कांद्याच्या साठवणुकीवरही निर्बंध लादण्यात आले. व्यापा-यांना कांदा लिलावात सहभागी न होण्याचे आयती संधी सरकारनेच उपलब्ध करून दिली व त्यातून शेतकºयांचे नुकसानही साधले गेले.
नाशिक जिल्हा हा जिरायती शेतीसाठी प्रसिद्ध आहे, त्यातही कांद्याच्या उत्पादनात तर नाशिकचा हात कोणी धरू शकणार नाही. खरीप (लाल), पोळ, लेट खरीप (रांगडा), उन्हाळ असे वर्षातून बाराही महिने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. बहुतांशी शेतक-यांचे अर्थकारण कांद्यावरच अवलंबून आहे. त्यातही उन्हाळ कांदा शेतक-यांना नेहमीच फायदेशीर ठरला आहे. चर्तुमास, पर्युषणपर्व संपल्यावर दरवर्षी सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढते व त्यातून शेतक-याला दोन पैसे अधिकचे मिळतात हे नेहमीच घडते. सध्या बाजारात उन्हाळ कांद्याबरोबरच लाल कांद्याचेही आगमन झाले आहे. उन्हाळ कांदा फारसा राहिलेला नाही, लाल कांदा येण्यास सुरूवात झाली असल्याने त्यावर दरावर परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. सध्या शेतकरी पुन्हा उन्हाळ कांद्याच्या लागवडीची तयारी करीत आहेत. यंदा नाही म्हटले तरी, अवकाळी पावसाने एक फटका दिल्यामुळे उन्हाळ कांद्याचे बियाणे (ऊळे) तयार करण्यावर परिणाम झाला आहे. शेतक-यांना दुस-यांदा पुन्हा बियाणे तयार करावे लागले आहेत, त्यातच कांद्याचे बाजारपेठेत वाढलेले दर पाहता बियाणे तयार करणा-या कंपन्यांनी चार ते पाच हजारापर्यंत दर वाढवून शेतक-यांना लुटण्याची संधी सोडलेली नाही. मागणी व पुरवठा या तत्वाचा कंपन्यांनीही फायदा उचलला व त्यातून निकृष्ट दर्जाचे बियाणे देवून शेतक-यांना जागोजागी फसवणूक झाल्याच्या तक्रारीही केल्या जात आहे. सध्या उन्हाळ कांद्याच्या तयारीत असलेल्या शेतक-याला पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये येणा-या कांद्याची चिंता आत्तापासूनच लागून राहिली आहे. उत्पादन येईल का आणि आले तर कांद्याला भाव मिळेल काय अशा विवंचनेत असलेल्या कांदा उत्पादक शेतक-याला आकाशात अधून मधून दाटून येणा-या काळ्या ढगांची धास्तीही तितकीच आहे. त्यामुळे गेल्या वर्षासारखीच यंदाही परिस्थिती दिसू लागलेली असताना पुढच्या वर्षी कांद्याचे भाव, सरकारचे निर्बंध, व्यापा-यांचा बहिष्कार या दृष्टचक्रातून कांदा उत्पादक शेतकरी बचावेल असे म्हणता येणार नाही.