नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी आणि संस्थानवर निष्ठावान वारकऱ्याचीच नियुक्ती करावी, असा ठराव वारकरी महामंडळाच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप श्रावण महाराज अहिरे होते.
नाशिक जिल्हा वारकरी महामंडळाची बैठक शनिवारी (दि. ५) रोजी त्र्यंबकेश्वर येथील शिवानंदगिरी आश्रमातील संत निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्थेत घेण्यात आली. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार हभप आध्यापक संदीप महाराज खकाळे यांनी केला. यावेळी संस्थानच्या विश्वस्त नेमणुकीसंदर्भात अधिक चर्चा करण्यात आली. संस्थानवर निष्ठावान आणि ज्येष्ठ वारकऱ्यांच्या नियुक्तीचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.
याबरोबरच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचा कळस सोन्याचा व्हावा, प्रसाद योजनेतून मंदिर परिसर विकास व्हावा, ब्रह्मगिरीसह आळंदी येथील भामचंद्रगडाचे अस्तित्व वाचवणे, सह्याद्री, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती यासह राज्य सरकारच्या वाईनच्या किराणा शॉपमधील खुल्या विक्रीला बंदी, यासह वारकरी संप्रदाय वाढवणे, तालुकावार भजन कार्यक्रम गावोगावी वस्तीत पाड्यावर घ्यावे, गाव, शहर, वस्ती तेथे वारकरी महामंडळ फलक, संघटन, तालुकावार वारकरी शिबिरे घ्यावी, असे अनेक ठराव महामंडळाच्या जिल्हा बैठकीत करण्यात आले.
यावेळी वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष दत्तू पाटील डुकरे यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या कामाची पाहणी केली. जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप श्रावण महाराज अहिरे, कार्याध्यक्ष दत्तू पाटील डुकरे, युवा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप खकाळे, उपाध्यक्ष सुभाष बच्छाव, जिल्हा सचिव हभप लहू महाराज अहिरे, जिल्हा संघटक प्रशांत भरवीरकर, संजय महाराज ठाकरे, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब कबाडे, शहरप्रमुख धनंजय रहाणे, राहुल पाटील, त्र्यंबक भंदुरे, साहेबराव अनवट, जिल्हा सल्लागार कृष्णा नाना भामरे, सुदर्शन शिंदे, तालुकाध्यक्ष हभप भरत मिटके (नाशिक), सचिव हभप जय्यतमहाल, देविदास जाधव (त्रंबकेश्वर), त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष जनार्धन पारधी, आनंदा कसबे, राजेंद्र काळे, संजय आव्हाड (चांदवड), नंदलाल सोनवणे (सटाणा), सचिव महेश खैरनार, सोमनाथ तांदळे (चांदवड), विश्वनाथ वाघ (निफाड), मधुकर ठोंबरे, काशीनाथ व्यवहारे, निवृत्ती बागुल, राम खुर्दळ यासह वारकरी यावेळी उपस्थित होते, प्रास्ताविक लहू महाराज अहिरे यांनी केले.