त्र्यंबकेश्वर : अपूर्ण राहिलेली कामे केव्हा पूर्ण करणार? ती का पूर्ण झाली नाहीत, अशा अनेक कामांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून नंतर अशा चुका करू नका, अपूर्ण राहिलेली कामे त्वरित पूर्ण करा, नागरिकांच्या तक्रारी पुन्हा यायला नको, अशी समज देऊन अडीच तास पंचायत राज समितीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रारंभ पंचायत राज समिती सदस्यांचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संपतराव सकाळे व इतमर नेत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समिती सदस्यांनी केवळ अधिकारी वर्ग यांच्या व्यतिरिक्त कोणालाच प्रवेश देण्यात आला नाही आणि दरवाजा बंद करण्यात आला. यावेळी समितीकडे असलेल्या प्रश्नावलीनुसार एक एक प्रश्न विचारुन अधिकाऱ्यांच्या साक्षी घेतल्या. यामध्ये कमिटीने नोंदवलेल्या साक्षींमध्ये कसलीही अपूर्तता आढळून आली नाही व समितीने कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले; मात्र सन २०१७-१८ मधील बोरीपाडा ते वरसविहीर रस्त्याच्या कामकाजाबाबत तक्रार करण्यात आली. यावेळी पीआरसी गटाचे प्रमुख आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या समितीत माधवराव जवळकर, किशोर दराडे, अमरनाथ राजुरकर, कैलास पाटील घाडगे आदी आमदारांचा समावेश होता.
-------------
अधिकाऱ्यांना धसका
गेले काही दिवस पंचायत राज समिती येणार म्हणून अधिकारी, कर्मचारी आदींनी या पंचायतराज समितीचा जणू धसका घेतला होता. त्र्यंबक तालुक्यात पंचायतराज समितीचा दौरा असल्याने सर्वांनी धसका घेतला होता. कारण या समितीमध्ये नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू उपचार केंद्र, पाणी पुरवठा योजना आदी कुठेही भेट देऊन पाहणी करतील. विधान मंडळाने नियुक्त केलेल्या ३१ आमदारांचा यात समावेश आहे.