नाशिक : तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या बेकायदेशीर मद्यसाठ्याच्या गुन्ह्यात चुंभळे यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना चुंभळेंचा ताबा देण्याचे पत्र सोमवारी (दि.१९) काढले. दरम्यान, आढळलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्यात सैन्यासाठी राखीव असलेल्या कोट्यामधीलदेखील काही ब्रॅण्डदेखील मिळून आल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला.लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ सापडलेल्या चुंभळे यांच्या घरांची झाडाझडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली. यावेळी त्यांच्या एका फार्महाउसवर मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांचा साठा पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पथकाने हा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हस्तांतरित केला. यानंतर विभागाने संशयित चुंभळे यांच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे मद्याचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तपासी अधिकारी दुय्यम निरीक्षक जयराम जाखिरे यांनी सोमवारी न्यायालयात संशयित चुंभळे यांचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करत विदेशी मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात कोठून कसा मिळविला तसेच या साठ्यात सैन्यदलाच्या राखीव कोट्यामधील काही ब्रॅण्डच्या ६५ बाटल्या कशा आल्या? याबाबत तपास करावयाचा असल्याने संशयित चुंभळे यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला ताबा हवा असे न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना चुंभळे यांचा ताबा सोपविण्याबाबतचे पत्र काढले. चुंभळे यांचा ताबा रात्री उशिरा घेतला जाण्याची शक्यता आहे.आढळून आलेल्या मद्यसाठ्यात सुमारे ५ लाख १२ हजार २८४ रुपये किमतीच्या विदेशी ब्रॅण्डच्या १४८ मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या आहेत. यामध्ये सैन्यासाठी राखीव असलेल्या कोट्यातील उच्च प्रतीच्या विदेशी ब्रॅण्डच्या बाटल्यांचाही समावेश असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. रात्री उशिरा उत्पादन शुल्क विभागाच्या तपासी पथकाने न्यायालयाचे पत्र तुरुंग अधिकाºयांकडे सादर केले.राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्यसाठ्याप्रकरणी चुंभळेंविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यात त्यांना पुढील तपासासाठी चुंभळे यांचा ताबा हवा आहे. कारण मद्यसाठ्यात काही बाटल्या संरक्षण खात्यासाठी राखी कोट्यातील असल्याचेही तपासात पुढे आले. न्यायालयाने तुरुंगाधिकाºयांना चुंभळे यांचा ताबा देण्याचे पत्र काढले.- अजय मिसर, विशेष सरकारी वकील
सैन्याच्या राखीव कोट्यातील विदेशी मद्य आले कोठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:50 AM