धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीतून पाणी वाहत आहे. गौरीपटांगण तसेच देवमामलेदार पटांगणावर वाहणाऱ्या पाण्यात शनिवार आणि रविवारी नाशिककरांनी भिजण्याचा आनंदही घेतला. याच वेळी या दोन्ही ठिकाणी वाहने धुण्यासाठी रांगा लागलेल्या असताना पोलिसांसह मनपाचेदेखील दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
गोदापात्र प्रदूषित करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करू शकतात, असे अवाहन नागरिकांना नेहमीच केले जाते. नदीपात्रात कुणीही कपडे धुऊ नये तसेच वाहने धुणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आदेशच पोलीस खात्याकडून काढले जातात. मात्र या वीकेण्डला गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी दुचाकी, चारचाकी लहान- मोठी वाहने धुणाऱ्यांची गर्दी झाली होती. त्यांना कुणाकडूनही अटकाव होताना दिसला नाही. नदीत स्वच्छ पाणी खळाळून वाहत असताना पात्र प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना यंत्रणा मात्र ढिम्म असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.