शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचीदेखील मागणी वाढू लागली आहे. गेल्या सुमारे पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात ऑक्सिजनची टंचाई आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन रुग्णालयांना ऑक्सिजन बेडसची परवानगी देणेही बंद केले आहे, तर खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करतानाच ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अनियमिततेविषयी संमतीपत्रदेखील लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिक जिल्ह्यासाठी ऑक्सिजन पाठविल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. पन्नास टन ऑक्सिजन येणार असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. प्रत्यक्षात २८ टन ऑक्सिजन मिळाला. त्यातील साडेचार टन साठा धुळ्याला गेला. उर्वरित साठा नाशिक जिल्ह्यासाठी असला तरी त्याचा वापर नक्की कोठे झाला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
सोमवारी म्हणजे साठा येऊन दोन दिवस झाले तरी ऑक्सिजन कोणकोणत्या रुग्णालयांना गेला हेच स्पष्ट होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक शहरात आलेला ऑक्सिजन सिन्नरच्या दोन आणि नाशिक शहरातील तीन पुरवठादारांना वाटून देण्यात आला आहे आणि सहा टन साठा अति दक्षतेची गरज म्हणून ठेवण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी रुग्णालयांना गरजेच्या वेळीच जर साठा दिला जाणार नसेल तर हा सहा टन साठा काेणासाठी आहे, हेच स्पष्ट होत नाही, असे अधिकाऱ्यांचेदेखील म्हणणे आहे.
इन्फेा...
जर मुबलकच नाही तर राखीव कोणासाठी?
नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण मुळातच गंभीर आहेत आणि त्यांनाच जर ऑक्सिजनचा साठा मिळणार नाही, तर राखीव कोणासाठी असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. ही दाखल रुग्णांची अवस्था आहे; परंतु ऑक्सिजन नाही त्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही, असे रुग्णसुद्धा अनेक असून त्यांना कधी दिलासा मिळणार, असा प्रश्न आहे.
इन्फो...
हक्काचा साठा वळविल्यानेच टंचाई : फरांदे
केंद्र शासनाने नाशिकसाठी पाठविलेला हक्काचा ऑक्सिजन साठा अन्यत्र वळविण्यात आल्याने नाशिक शहरात ऑक्सिजनअभावी भीषण अवस्था ओढावल्याचा आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. यासंदर्भात फरांदे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन दिले असून, शहरात ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांना घेऊन जाण्याच्या सूचना रुग्णालयांनी केल्या आहेत. त्यामुळे तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा, अन्यथा मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही फरांदे यांनी दिला आहे.