नाशिक : लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले.मात्र राज्यात सदरचे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. कोरोनाच्या संकट काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. पवार यांनी कोरोना उपाययोजना आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ असतांना येथील डॉक्टर्स उपचारासाठी पुढे येत नसतील तर हे लक्षणे चांगले नाही. कोरोना महामारीच्या काळात खासगी डॉक्टर्स पुढे येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
ते स्वत:हून पुढे येत नसतील तर त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास देण्यात आल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. समाधानाची बाब म्हणजे मुंबईचे चित्र बदलू लागले आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्याकरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे पवार यांनी सांगितले.
भाजपचा बहिष्कार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकींना उपस्थित राहू नये, असा फतवा महाआघाडी सरकारने काढल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचे राजकीय पडसाद उमटले. शुक्रवारी खा. शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीवर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी बहिष्कार टाकला.