खामखेडा : ‘टिंलम् टिंलम् टाळ वाजवीत आली वासुदेवाची स्वारी...’ असे म्हणत गाव जागवीत मुखी हरिनाम गात जाणारा वासुदेव पूर्वी खेड्यापाड्यात पहाटेच दाखल व्हायचा.. परंतु आता या वासुदेवाचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.अगदी प्राचीन राजा-राजवाड्याच्या काळापासून वासुदेवाची भूमिका राहत असे. पूर्वी वासुदेव समाजप्रबोधनाचे काम करीत असे. डोक्यावर मोरपिसाची टोपी, गळ्यात मोठमोठ्या मण्यांची माळ, चंदनाचा टिळा, अंगामध्ये अंगरखा, एक टांगी धोतर, एका हातामध्ये टाळी आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळी असा पेहराव असलेला वासुदेव पूर्वी गावागावांमध्ये सकाळच्या वेळेत नेहमी दिसत असे. हा वासुदेव गावामध्ये आल्यानंतर त्याच्या भोवती लहान मुलांची गर्दी होत असे. वासुदेव प्रत्येक घरासमोर जाऊन मुखी हरिनामाची ओवी गात उभे राहतो. तेव्हा घरामधील सुहासिनी सुपामध्ये धान्य आणून वासुदेवाला दान देत असे. वासुदेव तिच्या संसारचे नाव व कुळ विचारून त्यांच्या नावाचा गजर करून धान्य आपल्या झोळीमध्ये घेत असे.सध्या सटाणा येथे वास्तव्यास असलेल्या वासुदेवाला विचारणा केली असता तो म्हणाला की, पूर्वीचे लोक चांगले आणि मायाळू होते. आमचा आदरभाव केला जात असे. घरासमोर उभे राहताच घरातून ताबडतोब धान्याचे सूप येत असे. परंतु आता काळ बदललेला आहे. काही तरुण मुले आमची चेष्टा करीत टर उडवितात. आमची मुले या व्यवसायाला नाही म्हणतात. त्यांना यात रस नाही. तसेच पूर्वी सर्व लोक गावामध्ये राहत. आता शेतकरी सर्व लोक मळ्यामध्ये राहतात. त्यामुळे अगदी मोजके लोक दानधर्म करतात. प्रत्येक मळ्यामध्ये फिरणे परवडत नाही. तसेच शासनाने आमचा विचार करून आम्हाला थोड्याफार प्रमाणात मानधन सुरू करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
टाळ वाजवीत कुठे गेली स्वारीऽऽ
By admin | Published: October 30, 2014 10:27 PM