नाशिक : श्री हनुमान जन्मोत्सवानिमत्ताने नाशिकमधील सराफ बाजारात असलेल्या ‘सोन्या मारुती’ मंदिरासमोर श्रीरामाची सुमारे २० फूट लांबीची रांगोळी काढण्यात आली आहे. नाशिकमध्ये हनुमान जयंतीचा सर्वत्र मोठा उत्साह असून कुठे लाडून प्रसाद वाटप करण्यात आला तर कुठे मंदिरांची फुलांनी सजावट करण्यात आली. सायंकाळी मिरवणूकही काढण्यात आली.
शहर परिसरातील मंदिरांमध्ये सकाळपासून धार्मिक पूजा विधीच्या स्वरांनी परिसर मंगलमय झाला आहे. पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, गोदाघाटावरील दुतोंड्या मारुती या बरोबरच टाकळीतील गोमेय हनुमान मंदिरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. श्री काळाराम मंदिरात सामूहिक मारुती स्ताेत्र घेण्यात आले. असंख्य भाविक यामध्ये सहभागी झाले. सराफ बाजारातील मंदिरासमोर रांगोळीकार ओमकार टिळे यांनी २० फुटाची श्रीरामाची रांगोळी काढली.
उंटवाडीरेाड येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील मंदिरांमध्येही धार्मिक पूजाविधीसह सामाजिक उपक्रमाचा उत्साह दिसून आला.