नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या व्यक्तींवगळता कोणीही रस्त्यांवर भटकंती करणार नाही तसेच मास्कविना चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत ठिय्या देत गप्पांचे फड रंगविण्यासही बंदी घालण्यात आली आहे; मात्र आयुक्तालयातील काही भागांमध्ये याविरुद्ध चित्र रात्रीच्यावेळी पहावयास मिळत आहे. यामुळे रात्रीची संचारबंदी आहे तरी कुठं, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला असून, बुधवारी संध्याकाळपर्यंत नवे ४२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शहराचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७९ हजारांच्या पुढे सरकला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे.
कलम १४४च्या कायद्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कोणीही विनाकारण रस्त्यांवर भरकटणार नाही, असे स्पष्ट आदेश असतानाही शहरातील जुने नाशिक, पाथर्डी फाटा, नाशिकरोड आदी भागांमध्ये मध्यरात्री साडेबारा ते १ वाजेपर्यंत रेलचेल पहावयास मिळत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रमुख चौकांमध्ये पोलीस नजरेस पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संध्याकाळी जलतरण तलाव येथे नाकाबंदी करण्यात येत होती; मात्र रात्री ११ वाजेनंतर गरवारे पॉइंटपासून पुढे थेट द्वारकेपर्यंत पोलिसांची नाकाबंदी दिसून आली नाही.