नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत राबविण्यात आलेल्या रेशनच्या धान्य वितरणासाठी ईपीडीएस प्रणालीचा गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीने वापर सुरू झाल्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाविना शिल्लक राहिल्याने त्यातच शासनाने जून महिन्याचे धान्य चालू महिन्यातच उचलण्याचा तगादा लावल्याने धान्य ठेवायचे कोठे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. दुसरीकडे रेशन दुकानदारांकडे सलग तीन महिने धान्य शिल्लक राहिल्यास त्यांचा धान्याचा कोटा कमी करण्याच्या हालचाली पुरवठा खात्याने सुरू केल्या आहेत.गेल्यावर्षी पॉस यंत्राच्या सहाय्याने दुकानदारांना धान्याचे वाटप करण्याची सक्ती शासनाने केली असली तरी, अजूनही शिधापत्रिकाधारकांची डाटा एंट्री व आधार कार्ड जोडणीचे काम सुरूच आहे. अशा परिस्थितीत ज्या शिधापत्रिकाधारकाला पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य मिळत नव्हते त्यांना मॅन्युएल धान्य वाटप करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु १ एप्रिलपासून राज्य सरकारने ईपीडीएस प्रणालीचा सक्तीने वापर सुरू करून पॉस यंत्राचा वापर करूनच धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. परिणामी डाटा एंट्री व आधार जोडणी न झालेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि, जिल्ह्यात एप्रिल महिन्यात जवळपास ७२ टक्के धान्याचे वाटप ईपीडीएस प्रणालीचा वापर करून करण्यात आले, तर नाशिक शहरात मात्र हे प्रमाण ६२ टक्क्यांवरच थांबले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचे धान्य पडून असताना मे महिन्याच्या धान्याची उचल करावी लागली आहे. त्यामुळे त्यांची दुकाने अन्नधान्याने ‘फुल्ल’ झाली असून, धान्य ठेवायचे कोठे? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. अशा परिस्थितीत जून महिन्याच्या धान्याची उचल मे महिन्यातच करावी असा फतवा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने काढला आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने दुकानदारांना जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी चलने भरण्याचा तगादा लावला आहे; परंतु दुकानात धान्य ठेवण्यास जागा नाही, अन्यत्र दुसरीकडे कोठे ठेवल्यास थेट गुन्हा दाखल होण्याची कायद्यात तरतूद असल्यामुळे उचललेले धान्य दुसरीकडे ठेवताही येत नसल्याने दुकानदार अडचणीत सापडले आहेत.
रेशनचे धान्य ठेवायचे कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:22 AM