लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रेशनदुकानांमधून वाटप होणाऱ्या धान्यांबाबतच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही. नियमित कार्डधारकांना गहू, तांदूळ वाटप केला जात असतानाच आत्मनिर्भर योजनेचे धान्यदेखील दिले जात आहे. या योजनेतून दिली जाणार डाळ जुलैमध्ये अनेकांना मिळालीच नाही. दुकानदारांनी डाळ आली नसल्याचा दावा केला तर काही रेशनदुकानदारांनी डाळ वाटप केल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी डाळ आहे कुठे? असा प्रश्न पडतो. दुकानदार धान्य उचलत नसल्याचे पुरवठा खाते सांगते, तर धान्य आले नसल्याचे दुकानदारांकडून बोलले जाते. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने ‘रियालिटी चेक’ केले असता गोंधळाची परिस्थिती समोर आली. जुलै महिन्यात काही दुकानदारांनी डाळ वाटप केल्याचा दावा केला आहे. दुसºया योजनेतील डाळ आपणाला मिळाल्याचे सांगितले. काही दुकानदारांनी तर दोन महिन्यांपासून डाळ आली नसल्याचे सांगितले. गहू आणि तांदळाचा पुरवठा कमी झाल्याचेदेखील उत्तरे दुकानदारांनी दिली. धान्य नसल्याने ग्राहक विचारणा करीत असल्याने त्यापेक्षा दुकाने बंद ठेवलेली बरी म्हणून दुकाने बंद ठेवल्याचेही पाहणीत आढळले.लोकमत चमुच्या प्रतिनिधींनी ग्राहक आणि दुकादारांशीदेखील संवाद साधला यावेळी दोहोंच्या विधानात विरोधाभासही जाणवला.नागरिकांकडून चणाडाळ खरेदीला पसंती दिली जात असल्याचे रेशन दुकानदार सांगतात. तूरडाळीमुळे गॅस, अॅसिडिटीचा त्रास अधिक उद्भवतो त्यामुळे डाळीला मागणी नसल्याचे रेशन दुकानदार सांगतात. असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चणाडाळ अद्याप उपलब्ध न झाल्याने डाळीचे वाटप केले गेलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ आली मात्र तीदेखील वाटाणामिश्रित असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली नाही.
दुकानेही बंद
सिडकोत गुरु वारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिडको भागातील सरकारमान्य धान्य दुकानदारांच्या पाहणी केली असता यातील बहुतांशी दुकानेही बंद दिसून आली. दुकानदारांशी याबाबत विचारणा केली असता सरकारकडून अद्याप धान्य आले नसल्याचे सांगण्यात आले.गेल्या दोन महिन्यांपासून सरकारकडून कुठल्याही प्रकारची डाळ उपलब्ध झाली नसल्याची माहितीही दुकानादारांनी दिली. सरकारकडून चालू महिन्याचा धान्याचा साठा अद्यापही उपलब्ध झाला नसल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.पवननगर येथील रेशनदुकाराने गेल्या दोन महिन्यांपासून डाळ उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. दुसरीकडे केंद्राकडून येणारे मोफत धान्य येत नसले तरी ग्राहक मात्र विचारणा करीत आहे. नियमित लाभार्थ्यांना मिळणारे धान्य कमी वाटप होत असल्याचेही ग्राहकांनी तक्रार केली.
एकलहºयात प्रतीक्षा
जुलै महिन्याचे मोफत धान्य काही ठिकाणी बुधवारी (दि.५) रोजी पोहोच झाले असल्याने ६ तारखेपासून त्याचे वाटप सुरू झाले आहे, तर काही ठिकाणी अजून धान्य पोहोच झाले नसल्याने प्रतीक्षा आहे. या महिन्यात डाळ आली नसल्याचे मोफत धान्याचे तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीस वाटप केले जात आहे. मात्र धान्य पुरवठा अनिश्चित असल्याचे समोर आले.डाळ नाही.
.. मग शिल्लक डाळीचा पुरवठा होतो कुठून
पंचवटी : शासनाच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी जी डाळ दर महिन्याला मिळते ती डाळ मागच्या महिन्यात आलेली नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वी डाळ दिली ती शिल्लक पडली आहे. त्यावेळी ती जास्त डाळ आली होती. जे कार्डधारक डाळ घेण्यासाठी आले आले नाही त्यांचा कोटा शिल्लक आहे लॉकडाऊन काळात शासनाकडून कोटा पूर्ण मिळाला होता. सुरुवातीला एप्रिल, मे आणि जून महिन्यात डाळ मिळाली होती; मात्र नंतर जुलै-आॅगस्टमध्ये डाळ आलेली नाही. तांदूळ गेल्या महिन्यात मोफत मिळाला होता. एप्रिल मे आणि जून महिन्याचा मोफत तांदूळ भेटला तर जुलै महिन्यात गहू व तांदूळ मिळाला. केशरी कार्डसाठीचे धान्य मिळण्यासाठी दुकानदारांनी पैसे भरले परंतु एप्रिल धान्यच मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
काही दुकानदार म्हणतात डाळ उपलब्ध...
गंगापूर परिसर मागील महिन्याचे धान्य अजूनही वाटप सुरू आहे. डाळ काही ठिकाणी वाटप झाल्याचे सांगण्यात आले, तर काही ठिकाणी जागा नसल्याने डाळ आणली नसल्याची उत्तरे मिळाली. विशेषत: गंगापूर, गोवर्धन, जलालपूर, चांदशी, महादेवपूर, दुगाव, गिरणारे, वडगाव, धोंडेगाव, लाडची येथील दुकानांमध्ये संमिश्र परिस्थिती आढळली. बहुतेक दुकाने तर बंद अवस्थेतच होती. जागेअभावी रेशनधान्य वाटपास विलंब होत असल्याची उत्तरे काहीदुकानदारांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून डाळ वाटप झालेच नसल्याचेदेखीलदुकानदार मान्य करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून डाळ उपलब्ध नसल्याचे वाटप नसल्याचेदेखील दुकानदार सांगतात.
डाळ नेमकी शिजते कोठे ?
वडाळागाव : परिसरातील तीनही रेशन दुकानदारांकडून डाळीचे वाटप गोरगरीब नागरिकांना मागील महिन्यात झालेले नाही. जूनअखेर नागरिकांना वाटाणा डाळमिश्रित तूरडाळ करून वाटप करण्यात आली होती. यंदा मात्र रेशनमधून डाळ दिली गेलेली नसल्याने चर्चेतून समोर आले. जुनअखेर रेशन दुकानदारांकडून वाटाणा-तूरमिश्रित भेसळ डाळीचे वाटप झाले. जुलै महिन्याच्या धान्यवाटपात केवळ गहू-तांदूळ दिले गेले; मात्र डाळीचे वाटप झाले नाही. तसेच मे आणि जून महिन्यात केवळ तांदूळ दिला गेला. मातीमिश्रित तांदूळ मिळत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी बोलून दाखविली.
दुकाने बंद ठेवलेली बरी
इंदिरानगर : परिसरातील बहुतेक रेशन दुकानदारांनी जुलै महिन्यात पैसे भरून सुद्धा केशरी रेशनकार्डवरील धान्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते असल्याने त्यांनी रेशन दुकान न उघडणेच पसंत केले आहे. राजीवनगर येथील दुकानदारांशी संपर्क केला असता त्यांनी जुलै महिन्यात केशरी रेशन कार्डधारकांचे पैसे भरून सुद्धा गहू-तांदूळ अघापही मिळाला नाही. जुलै महिन्यात मोफत वाटप करण्याची डाळ सुद्धा मिळाली नाही. या महिन्याचे पैसे भरले असून, अद्याप धान्य आले नाही असे सांगितले. पाथर्डी गावतही तशीच परिस्थिती आहे. ग्राहकांना धान्य आणि डाळींबाबत अजूनही योग्य माहिती मिळत नाही.