नाशिक : महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची गर्जना एखाद्या राष्ट्रीय पक्षाकडून करणे यात काही नवीन नाही किंवा त्यांच्या घोषणेला दुर्लक्षूनही चालणार नाही. परंतु राजकीय सारिपाटावर अशी गर्जना करणाऱ्या पक्षांचा कित्ता गिरवत काही नवखे आणि लहान पक्षही निवडणुकीत स्वत:च्या ताकदीवर उतरणार असल्याची घोषणा करतात. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करेपर्यंत त्यांची ताकदच समोर येत नाही. कोण कधी कुठे असतो हेच मुळात त्या पक्षाच्या शहर, जिल्हाध्यक्षाला माहिती नसते. तसेच विविध पक्षांच्या आघाड्यांना कुणाचीही ग्वाही देता येत नाही. नाशिक मनपाच्या निवडणुकीनिमित्ताने हे चित्रही समोर आले आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक लहान पक्षांनी एकत्र येत एकतेची मोट बांधली. काहींनी तर केवळ दलित मतांसाठी एकत्र आल्याची घोषणा करून टाकली. एमआयएम, बीएसपी, सपा, भारिप यांसारख्या पक्षांनीही उमेदवारी करण्याची घोषणा करीत तयारी चालविली आहे. या पक्षांच्या नेत्यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणुकीचा बिगुलही फुंकला. इतर राजकीय पक्षांप्रमाणे या पक्ष, आघाड्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. चर्चा, बैठका सुरू झाल्या मात्र त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष तर कुणाच्याही संपर्कात नसल्याने या पक्षाकडून इच्छुक हवालदिल झाले आहेत. अन्य एका राजकीय पक्षाने सोलापूर, मुंबई, पुणे येथे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यात नाशिकचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था आहे. मात्र हा पक्ष पुरोगामी आघाडीसोबत आहे. बसपाने सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. काही ठिकाणी उमेदवारी निश्चितही मानली जात आहे. परंतु त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. मुळात सर्व प्रभागासाठी उमेदवार शोधण्याचे मोठे काम बसपाला करावे लागले आहे. या पक्षाचे इतर पक्षांच्या उमेदवारांसाठी दरवाजे खुले असल्याचे समजते. मात्र पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. सर्वच प्रभागात उमेदवार उभे करायचे जाहीर केल्याने तेवढ्या संख्येने आणि ताकदीचे उमेदवार उभे करण्याचे मोठे आव्हान या पक्षापुढे असणार आहे. (प्रतिनिधी)
ताकदीवर लढणार पण ताकद कुठे?
By admin | Published: February 03, 2017 1:13 AM