लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशात मराठी माणूस जेथे असेल तेथे मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करून तेथील मराठी माणसाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गोवा राज्यात याबाबतचा पहिला पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. याबाबतची प्रकिया सुरू झाली असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाशिक दौऱ्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यापीठाचा विस्तार वाढविण्यासंदर्भात आढावा घेतल्याचे सांगितले. गोवा राज्यात असलेल्या मराठी भाषिकांसाठी तेथे उपकेंद्र सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू असून तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसे आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठाची केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना मुक्त विद्यापीठाचा लाभ व्हावा यासाठी कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्यांमधील चंदगड, उमडी आणि म्हैसाळ या गावांमध्ये केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा यांचे मिळून एक तर नागपूर, अमरावती, अकोला,यवतमाळ आणि वाशिम येथे उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रशिक्षणाशी संंबंधित जे अभ्यासक्रम आहेत, त्यांची युजीसीने परवानगी नाकारली असली तरी राज्याच्या पातळीवर अशा अभ्यासक्रमांना मंजुरी देण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मुक्त विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांविषयी आलेल्या तक्रारींबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक शहरात मुक्त विद्यापीठाच्या अद्ययावत उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वत: मनपा आयुक्तांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे १० कोटी रुपये खर्च करून मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील जागेचा ताबा विद्यापीठाला मिळालेला आहे. येथील कामासाठी विद्यापीठ निधीतून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्या दोन सर्व्हे क्रमांकाचा वाद नाही, तेथे काम सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. यासाठी येत्या १५ एप्रिलनंतर निविदा काढल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले.
--इन्फो--
...तर दोषींवर कारवाई
पुणे विद्यापीठातील परीक्षेतील गोंधळासंदर्भात सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर राज्यपालांच्या परवानगीने प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.