नाशिक : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत वाहन खरेदीकरिता कर्ज प्रकरण मंजूर व्हावे यासाठी एका ३० वर्षीय कंत्राटी शिपायास लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संशयित दत्ता मारुती घोडे असे या लाचखोर शिपायाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, नाशिकमधील ५३ वर्षीय तक्रारदार यांच्या सुशिक्षित बेरोजगार तक्रारदार युवकाला महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या माध्यमातून लहान मालवाहू वाहन खरेदीसाठी चार लाख ७१ हजार ४०१ रुपये कर्ज हवे होते. यासाठी त्याने महामंडळाच्या नाशिक कार्यालयात अर्ज केला होता.
संशयित शिपाई घोडे याने शासकीय कार्यालयातील ओळख व त्याच्या नावाचा प्रभाव दाखवून कर्ज प्रकरण मंजुरीच्या मोबदल्यात तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे व पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे व पोलीस हवालदार सचिन गोसावी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.