नाशिक : शहर बस वाहतूक करणाऱ्या बसेसपैकी पंचवटी आगाराची बस (एमएच १५, एके ८०८३) नाशिकरोडहून त्र्यंबक नाकामार्गे उत्तमनगरकडे जात असताना अचानकपणे चालकाच्या कॅबिनमधून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ वाहनांच्या गराड्यातून बस बाजूला उभी के ली. वाहकाने अग्निशामक दलाशी संपर्क साधत माहिती दिल्याने अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी, नाशिकरोडहून प्रवासी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबक नाक्यावर आली असता दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला. ही बाब तत्काळ चालक-वाहकाच्या लक्षात आली. चालक संतोष घोडके याने बस सुरक्षितरीत्या रस्त्याच्या कडेला उभी करत बसमधील अग्निप्ररोधक यंत्राच्या सहाय्याने पावडरचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुर्घटना टळली. महिला वाहक ज्योती अरिंगळे यांनी भ्रमणध्वनीवरून अग्निशामक दलाशी संपर्क साधला. शिंगाडा तलाव येथून अग्निशामकचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यात जवानांना यश आले. जेव्हा बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये सुमारे दहा ते पंधरा प्रवासी होते. चालक, वाहकांनी दाखविलेले प्रसंगावधान व अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे अनर्थ टळला.
उत्तमनगरकडे जात असताना चालत्या बसने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:03 AM