नाशिक- सातपूर येथील बंद पडलेल्या शिवम टॉकीजच्या जागेवर अभिनेता सलमान खान आपल्या नविन मॉलसह सिनेमागृह बांधणार असल्याची चर्चा आहे, जागा मालकाने देखील त्यात दुजोरा दिला आहे. मात्र असे झाल्यास सलमान खानच्या घरासमोर आंदोलनासाठी तयार रहाण्याचे आवाहन माकपा नेते डॉ. डी. एल. कराड यांनी दिला आहे.
सातपूर येथील शिवम चित्रपटगृहाकडे जाणाऱ्या महापालिकेच्या रस्त्यावर झोपडपट्टया असून महापालिकेच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी चित्रपटगृहाचे मालक राजेश रॉय यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र १९९१ पासून महापालिका कारवाई करीत नसल्याने महापौर आणि आयुक्तांची खूर्ची जप्त करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आले होते. सदरची झोपडपट्टी त्वरीत हटविण्याचे लेखी आश्वासन देऊन सुटका करून घेतली त्यानंतर याठिकाणी मार्किंग करून घेण्यात आले आहेत. आता अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू होणार असली तरी स्थानिक नागरीकांनी कारवाईस विरोध दशविला आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक देखील संपन्न झाली.
शिवम चित्रपटगृह १९९३ पासून बंद आहे. मात्र आता अभिनेता सलमान खान याची कंपनी दुस-या दर्जाच्या शहरात छोटी आणि परवडणारी बहुपडदा चित्रपटगृह तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नाशिकमध्येच नाही तर मुंबईत सलमान यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी ठेवा. हिरो व्हीलन होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही असेही डॉ. कराड बैठकीत म्हणाले. एका चित्रपटगृहासाठी हजारो नागरीकांना विस्थापीत करणे सहन केले जाणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सीमा निगळ तसेच सिंधू शार्दूल, दीपक गांगुर्डे आदींसह स्थानिक नागरिकांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक भाषणात याचिकाकर्ते योगेश गांगुर्डे यांनी सांगितले.