नाशिक : शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन घेऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे 50 भाविकांना घेऊन मुंबईकडे नाशिकमार्गे जाणारी खासगी बस महामार्गावर घोटी शिवारात उलटली. बसचालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस दुभाजकावर आदळून उलटली. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता घडला. या भीषण अपघातात तीन भाविक जागीच ठार तर पंधरपेक्षा अधिक जखमी झाले आहेत.
नाशिकवरून दुपारी साडे चार वाजता भाविक नाश्ता करून पुढच्या प्रवासाला जात होते. नाशिकवरून सुमारे पंचवीस किलोमीटरवर घोटी अगोदरच पाडळी गावाच्या शिवारात खासगी बस (MH 01 CV9675) वाहनचालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू, तर पंधराहुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बसचालक भरधाव वाहन चालवित समोरील वाहनांना ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला असल्याचे बसमधील बचावलेल्या तरुणांनी सांगितले. चालक सातत्याने ओव्हरटेक करत होता त्यामुळे बस हेलकावे खात होती आम्ही झोपेतून जागे झालो अन बस उलटली असे बसमधील प्रवासी तरुण ऋषीकेश पाठक याने लोकमत शी बोलताना सांगितले. हा अपघात खूप भीषण होता सुदैवाने आम्ही चौघे विरारचे मित्र बचावलो, असे प्रदीप पाठक याने सांगितले.