नाशिक - दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एक 18 वर्षीय युवकाचा रामशेज किल्ल्यावरुन सेल्फी घेताना पाय घसरून किल्ल्यावरील ऐतिहासिक तलावात कोसळून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आशेवाडी शिवारात घडली. रितेश समाधान पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पत्रकार समाधान पाटील यांचा तो एकुलता मुलगा होता. त्याच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जानोरी येथील सहा युवा मित्रांसोबत रितेश रामशेज किल्ल्यावर गुरुवारी (दि.20) भ्रमंतीसाठी गेला होता. गडावर चढत इतिहासाच्या पाऊलखुणा बघत त्या आपल्या मोबाईल मध्ये रितेश टिपत होता. येथील ऐतिहासिक तळ्याजवळ पोहचल्यावर तळ्याच्या काठावर उभे राहत 'सेल्फी' काढण्याच्या नादात रितेश तळ्याच्या कडेवरून पाय घसरल्याने कोसळला.
तळ्यात पाणी कमी असल्याने त्याच्या डोक्याला दगडाचा जबर मार बसला. त्यास मित्रांनी गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढत तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने खाली आणून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले; मात्र डोक्याला जबर मर लागून रक्तस्राव झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. रितेश हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शिवप्रेमी म्हणून त्याची जानोरी पंचक्रोशीत खास ओळख होती. गणेशोत्सव काळात जानोरी येथे जिवंत देखावे सादर करताना रितेश दरवर्षी हिरहिरीने सहभागी होत कधी शिवराय तर कधी संभाजी राजे व त्यांच्या मावळ्यांची भूमिका साकारत होता. एक शिवप्रेमी युवकाचा रामशेज किल्ल्यावर झालेल्या अशा दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आजी,आजोबा,आई-वडील,बहीण, चुलते, चुलती असा परिवार आहे.