--------------------------------
उत्कृष्ट अतिशयोक्ती अलंकार!
कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा एखाद्या प्रख्यात आणि नावाभोवती प्रचंड वलय असलेल्या व्यक्तिमत्त्वाला निमंत्रित केले जाते, त्यावेळी त्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करणारे नेहमीच संबंधितांच्या महानतेचे पूल बांधतात. अवघ्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका सोहळ्याला साक्षात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यामुळे परिचयकर्ता तसेच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी सरसंघचालकांच्या महानतेचे अनेक दाखले दिले. तसेच त्यांना अर्पण करण्यात आलेल्या सन्मानपत्राच्या वाचनासह, गौरवपर गीतांमध्येदेखील त्यांच्याबाबतची वर्णने करून गौरवपर स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर सरसंघचालकांनी त्यांचे यथोचित भाषण पूर्ण केले. तसेच भाषणाच्या अखेरीस याआधीच्या कार्यक्रमात माझ्याबाबत जी काही मते व्यक्त करण्यात आली आणि स्तुतिवर्षाव करण्यात आला, त्यातील शब्द हे ‘अतिशयोक्ती अलंकारा’चे उत्कृष्ट उदाहरण समजावे, असे सरसंघचालकांनी म्हणताच संपूर्ण सभागृहात हास्याची कारंजी उसळली.
-----------
धनंजय रिसोडकर