राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी झाली, तेव्हा त्यात घेतल्या गेलेल्या नाशिकच्या नावांबाबतही नाराजीची चर्चा झडून गेली होतीच. ‘कालच्या आलेल्यांना’ थेट प्रदेशस्तरावर कसे घेतले गेले, हा त्या नाराजीमागील प्रश्न होता. आता जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व प्रवक्ते नेमले गेल्यावर संधी डावलले गेलेले नाराज झाले आहेत म्हणे. वस्तुत: जिल्ह्याचे संघटनात्मकदृष्ट्या विभाजन करून लोकसभा मतदारसंघनिहाय दोन जिल्हाध्यक्ष व त्यांना सहकार्याला कार्याध्यक्ष असा ‘फॉर्म्युला’ यंदा वापरला गेला. त्यामुळे एकापेक्षा अधिकांना संधी मिळून गेली. यातून आजवरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे पंख कापल्याचा अर्थ काढला जाणे स्वाभाविक असले तरी, पक्षाने सामाजिक समतोल साधण्याची चतुराई यात दाखविली. शिवाय, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा सल्ला त्यासाठी घेतला गेला. असे असताना नाराजी व्यक्त केली जात असेल तर काय गावोगावी व गल्लोगल्ली जिल्हाध्यक्ष नेमायचेत का, असाच प्रश्न उपस्थित व्हावा. बरे, तसे करायचे झाल्यास त्यासाठीही सक्षम माणसे हवीत. आहेत का ती तेवढी? प्रदेश सहकोषाध्यक्ष व सहकार सेलचे राज्याचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना खाली उतरवत जिल्हा प्रवक्तेपदी व प्रदेश प्रवक्ते व राज्य उपाध्यक्ष असलेल्या डॉ. भारती पवार यांनाच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अतिरिक्त जबाबदा-या देण्यात आल्याचे पाहता अशी जर ‘वानवा’ असेल तर मग नाराज होणारी मंडळी कोण व काय क्षमतेची याचा विचारच न केलेला बरा. दुर्दैव असे की, नवोदितांनी गुडघ्याला बाशिंग बांधून असणे एकवेळ ठीक; पण सर्वकाही भूषवून व मिळवून झालेले जुनेही आपली ‘जीर्णता’ न सोडता पदांमध्ये मन अडकवून ठेवणार असतील तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘जयवंत’ होण्याची अपेक्षा न धरलेलीच बरी !
राष्ट्रवादीत कोण नाराज ?
By किरण अग्रवाल | Published: September 23, 2018 1:37 AM
अगोदर कार्यकर्ता बनून नंतर नेतेपदावर जाण्याचे दिवस संपलेत, आता राजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी असतात; थांबायला कुणी तयार नसतो. दुसरे म्हणजे, आपली उपयोगीता संपली हे जाणून न घेता अनेकजणांचा पदांवर बनून राहण्याचा किंवा निवृत्ती काळातही ते मिळविण्याचा सोस कायम असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित झाल्यावर नाराजीची भावना पुढे आली ती त्यातूनच.
ठळक मुद्देराजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी ‘कालच्या आलेल्यांना’ थेट प्रदेशस्तरावर कसे घेतले गेले,जयंत पाटील यांनी ‘जयवंत’ होण्याची अपेक्षा न धरलेलीच बरी !