नाशिक : सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भरपावसात जाहीर सभा घेतली आणि वातावरण फिरले. त्याचबरोबर परळीतील मैदानात मुंडे भाऊ-बहिणीच्या वादात व्हायरल झालेल्या क्लिपमुळे सहानुभूतीचा डाव उलटविण्यात धनंजय मुंडे यशस्वी झाले... अशा निकालोत्तर चर्चांना आता उधाण आले असताना जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीत काही अनपेक्षित तर काही धक्कादायक निकालाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात जिल्ह्यात राष्टय व राज्यस्तरीय नेत्यांनी घेतलेल्या जाहीर सभांचा कोणत्या उमेदवारांना काय लाभ झाला, याचाही हिशेब मांडला जाऊ लागला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड, सटाणा आणि नाशिकमध्ये जाहीर सभा घेतल्या. फडणवीस यांनी घेतलेल्या सभांमुळे चांदवड, बागलाणमध्ये विजय सुकर झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, फडणवीस यांनी नाशिकला गोदाघाटावर घेतलेल्या सभांमुळेही शहरातील तीनही जागा राखण्यात भाजपला यश आल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वणी, येवला आणि मनमाड याठिकाणी सभा घेतल्या. मात्र, दिंडोरी आणि येवला येथील शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला, तर नांदगाव मतदारसंघ शिवसेनेने राष्टÑवादीकडून पुन्हा ताब्यात घेतला. मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची नांदगावला होणारी नियोजित सभा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने त्यावेळी ठाकरे-भुजबळ यांच्या साटेलोट्यांबाबत चर्चांना उधाण आले होते. यंदा मात्र, ठाकरे यांच्या सभेचा परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे.राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सटाणा, पिंपळगाव बसवंत, वणी, मनमाड तसेच मखमलाबाद, पवननगर येथे सभा घेतल्या; परंतु बागलाण आणि नाशिक शहरातील नाशिक पूर्व व पश्चिम मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवाराचे विजयाचे गणित मांडता आले नाही. निफाड आणि दिंडोरी मतदारसंघातील त्यांच्या सभांमुळे दोन्ही जागांना फायदा झाला; मात्र नांदगावला भुजबळ पुत्राला पराभवापासून ते वाचवू शकले नाहीत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नाशिकला डोंगरे वसतिगृह मैदानावर एकमेव सभा झाली; परंतु राज यांच्या सभेचा नाशिक शहरातील मनसेच्या एकाही उमेदवाराला लाभ उठविता आला नाही. एमआयएमचे पक्षप्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मालेगाव मध्य मतदारसंघात एकमेव सभा झाली आणि या मतदारसंघातून एमआयएमचा उमेदवार निवडून आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मनमाडला जाहीर सभा झाली मात्र जिल्ह्यात एकाही उमेदवाराला आपला प्रभाव दाखविता आला नाही.भाजप नेत्यांचा धडाकानाशिक शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच भाजपचे राष्टÑीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा व मेळावा झाला. याशिवाय, नाशिक पश्चिममध्ये रिपाइंचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही जाहीर सभा घेतल्याने भाजप उमेदवाराचे मतांचे पारडे जड होऊ शकल्याचे सांगितले जात आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्याही रॅली व सभांचा फायदा निफाड, दिंडोरी आणि सिन्नरच्या उमेदवारांना झाल्याचा दावा केला जात आहे.
नेत्यांच्या सभांचा फायदा-तोटा कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 1:08 AM