इंदिरानगर : पूर्व प्रभाग सभेत भाजपचे बहुमत असल्याने भाजपचा सभापती होणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ॲड. श्याम बडोदे याची वर्णी लागण्याची शक्यता असली तरी, सध्या बडोदे यांच्याकडेच सभापतिपद असल्याने येत्या सहा महिन्यांसाठी सभापती होण्यास कोण तयार होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे गेली चार वर्षे भाजपाचा सभापती विराजमान होता. पूर्व विभागात पाच प्रभाग या प्रभागातील एकोणावीस नगरसेवकांमध्ये भाजपचे १२ राष्ट्रवादी ४ काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून सतीश कुलकर्णी यांना महापौरपदी, प्रथमेश गिते यांना उपमहापौर, सभागृहनेतापदी सतीश सोनवणे, रूपाली निकुळे सुप्रिया खोडे, यांना स्थायी समितीवर, तर डॉ दीपाली कुलकर्णी यांना आरोग्य सभापतिपदी आणि शाहीन मिर्झा, सुमन भालेराव यांना सभापतिवर संधी देण्यात आली आहे. मार्च महिन्यांत होणारी प्रभाग सभापती निवडणूक झाली नाही. सुमारे पाच महिन्यांनंतर प्रभाग सभापती निवडणूक होणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सभापतींना सुमारे तीन महिने जास्त मिळाले आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यांसाठी सभापती बनण्यासाठी कोणीही तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा फायदा पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे यांना होणार आहे की पक्ष शेवटची संधी म्हणून अन्य कोणाला उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.