नाशिक : गेल्या महिन्यातील २१ तारीख! पावणे बारा वाजेची वेळ... महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात जवळ बसविण्यात आलेल्या टाकीत ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू असतानाच अचानक व्हॉल्व्ह तुटला आणि ऑक्सिजनची तेथेच गळती होऊन सर्वत्र गॅस पसरला. ही गळती थांबविण्याचे काम सुरू असतानाच दुुसरीकडे व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांची जीव वाचवण्याची एकच धावपळ उडाली. रुग्णालयात असलेले कोणी जम्बो तर कुणी ड्यूरा सिलिंडर आणले. रुग्णांच्या नातेवाइकांनी कोरोना संसर्गाची पर्वा न करता रुग्णालयात धाव घेतली आणि आपल्या माणसाला वाचवण्यासाठी पंपिंग केले. सर्व घडामोड सुमारे तीस ते बत्तीस मिनिटे चालली; परंतु या वेळेत अपुरा ऑक्सिजन काळ ठरला आणि २२ रुग्णांचा जीव गेला.
शासनाने तातडीने उचस्तरीय चौकशीची घोषणा केली. त्यानुरूप विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने पंधरा दिवसांची मुदत संपण्याच्या आतच अहवालदेखील शासनाला सादर केला. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात राहिले.
गमे समितीने या दुर्घटनेचा ठपका कोणावर ठेवला, त्यांच्यावर कारवाई झाली का, समितीच्या शिफारशींचे पुढे काय झाले, शासनाने मुळात अहवाल स्वीकारला की नाही, हे काहीच स्पष्ट झाले नाही.
केारोना संकट काळात नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय अत्यंत उपयुक्त ठरले. महापालिकेने याठिकाणी अनेक सुविधा दिल्या. तसेच गरजवंत रुग्णांसाठी ऑक्सिजन टाकीदेखील बसवली. ३१ मार्च रोजी ही टाकी बसली आणि २१ दिवसांव्या दिवशी ही दुर्घटना घडली. हा अपघात असला तरी त्यात कोणाचा तरी निष्काळजीपणा असणारच, त्याचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीची घोषणा मुंबईत केली आणि त्याच दिवशी सायंकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समितीच्या सदस्यांची घोषणा केली. पंधरा दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गमे यांनी चौकशी करून मुदतीपूर्वीच शासनाला अहवाल सादर केला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्याला दुजोरा दिला. मात्र, पुढे या अहवालाचे काय झाले, चौकशी समितीत ठपका कोणावर ठेवला, शिफारशी स्वीकारल्या काय, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती शासनामार्फत देण्यात आलेली नाही.
कोट...
शासनाच्या आदेशानुसार चौकशी करून मुदतीपूर्वीच शासनाला अहवाल सादर केला आहे. चौकशी बरोबरच शिफारशीदेखील केल्या आहेत. याबाबत पुढील योग्य ती दखल शासनच घेईल.
- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक
इन्फो...
ऑक्सिजन पुरवठा कंपनीवर ठपका
नाशिक महापालिकेने ऑक्सिजन टाक्या दहा वर्षांसाठी भाड्याने घेतल्या असून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. मात्र, दुर्घटना घडला त्यादिवशी कंपनीचा कोणीतही तंत्रज्ञ त्याठिकाणी नव्हता. किंबहुना त्याठिकाणी चोवीस तास तंत्रज्ञ नियुक्त करावा, अशी अटच महापालिकेने टाकलेली नाही. त्यामुळे गमे यांच्या समितीने यासंदर्भातच ठपका ठेवल्याचे वृत्त आहे.