नाशिक- कुंभमेळा हा साधु महंताचा उत्सव आहे, त्यामुळे स्वत:च्या घरातल्या सत्य नारायणावर कोणी बहिष्कार घालतात का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज महंतांनाच केला. नाराज झालेल्यांची समजूत पालकमंत्री काढतील असेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत आणि तात्पुरत्या स्वरूपाची कामे सुरू आहेत. तथापि, ही कामे कुठे आणि कशी करावी याबाबत साधु महंत वेळोवेळी नाराजी व्यक्त करीत असतात. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरात येऊन कुंभमेळा पूर्वतयारीची आढावा बैठक घेणार असताना सकाळी त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेचे हरीगिरी महाराज यांनी शासनावर तोफ डागली. शासन हे आखाड्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असून त्यामुळे १४ जुलै रोजी ध्वजारोहणानंतर आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीत स्नान करू असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी कुंभमेळा हा साधु संत महात्म्यांचा असतो. त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम असते. त्यानुसार काम सुरू असून साधु महंतांच्या सहकार्यानेच तो यशस्वी होऊ शकतो. आपल्या घरात सत्यनारायण असताना त्यावर कोणी बहिष्कार घालते का असा प्रश्न करून आमचे (पालक) मंत्री महंतांची नाराजी दूर करतील असेही ते म्हणाले. दरम्यान, फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांनी तयारीचे सादरीकरण केले. पोलीस आयुक्त जगन्नाथन आणि महापालिका आयुक्त डॉ. प्रविणकुमार गेडाम यांनी विविध अडचणी सांगितल्या. अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तत्पूर्वी त्यांनी साधुग्राम, रामकुंड आणि गोदाघाटांची पाहणीही केली.
घरच्या सत्यनारायणावर कोणी बहिष्कार घालते काय?
By admin | Published: June 28, 2015 1:26 AM