संजय पाठक, नाशिक- दीड दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने महाराष्टÑातील सतरा प्रदुषणकारी शहरांची यादी घोषीत केली आणि त्यात नाशिकचा समावेश केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिकेने शासकिय आदेशानुसार हवा प्रदुषण कमी करण्यासाठी समिती गठीत केली आणि कृती आराखडा तयार केला आहे. तथापि, प्रदुषण मंडळाला देखील नाशिकची हवा इतकी प्रदुषीत आहे यावर विश्वास बसत नाहीये. मग प्रश्न हाच निर्माण झालाय नाशिकची हवा कोण बिघडवतंय?
पूर्वापार काळापासून उत्कृष्ट हवा पाण्यासाठी नाशिक योग्य मानले जाते. उत्तर महाराष्टÑाच्या राजधानीचे हे शहर ब्रिटीश काळापासून याच कारणासाठी परीचित आहेत. अनेक सॅनोटरीयम या शहरालगत आहे. कालौघात शहरात औद्योगिककरण वाढले आणि खासगी वाहनांची संख्या वाढल्याने प्रदुषण वाढत गेले असे असले तरी नाशिकची देशपातळीवर दखल घेतली जाईल या विषयी शंका आहेत. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दोन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. नाशिकचे हवामान इतके खराब असेल असे वाटत नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले होते. त्यामुळेच हा संशय देखील वाढत आहे.
नाशिकमध्ये प्रदुषण मापन करणारी पाच केंद्रे आहेत. तथापि, नाशिक महापालिकेची हद्द २५९ चौरस किलो मीटर आहेत. १९९३- ९५ दरम्यान नाशिक महापालिकेचा पहिला विकास आराखडा मंजुर झाला. यात जेमतेम वीस टक्के रहीवासी क्षेत्र वाढविण्यात आले होते. तर २०१७ मध्ये मजुर झालेल्या दुस-या विकास आराखड्यात हे प्रमाण सुमारे ७० ते ८० टक्के इतके रहीवासी क्षेत्रात वर्ग होईल. मात्र, या सर्वांचा विचार केला तरी अद्याप शहर उजाड झाले आहे, आणि कोठेही सावलीला जागा नाही अशातला भाग नाही. महापालिकेच्याच सर्वेक्षणानुसार केवळ झाडांची गणना केली तर ४७ लाख झाडे शहरात आहेत. हरीत क्षेत्र म्हणजे शेती वेगळीच. असे असताना अवघ्या चार- पाच ठिकाणी हवेची गुणवत्ता तापसून सर्व शहरच प्रदुषणकारी आहे, असा निष्कर्ष काढता येईल का असा खरा प्रश्न आहे.
यात आणखी काही पर्यावरणवादी संस्थांच्या सर्वेक्षणाचा गोंधळ आहे. या संस्थांनी गेल्या दोन वर्षात राज्यातील प्रदुषणात नाशिकचा क्रमांक सहावा आणि आता पाचवा दर्शवला आहे. त्यामुळे खूपच विसंगती आहे. एकीकडे नाशिकमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया संस्था ही आकडेवारी उचलून धरतात तर दुसरीकडे महापालिका फक्त केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीलचा वैध मानते. त्यामुळे खरे काय हे स्पष्ट होत नाहीत. नाशिकमध्ये प्रदुषण वाढू नये त्यासाठी पर्यावरण संस्था पुढाकार घेत असतील तर स्वागत आहे. मात्र, शासकिय- निमशासकिय यंत्रणा आणि पर्यावरणवादी संस्थांचा अहवाल यात कुठे तरी मेळ बसला पाहिजे. नाशिक खरोखरीच प्रदुषीत असेल तर गांभिर्याने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा प्रदुषणाची इतकी भयानक तीव्रता नसेल तर प्रदुषणाचा अपप्रचार नाशिकच्या विकासाला मारक ठरेल.