नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस आघाडीचं ठरलंय, युतीचं ठरतंय, वंचित-एमआयएमचे बिनसलंय...अशा वार्ता येत असताना महाराष्टच्या राजकारणात थेट पहिल्या पंचवार्षिक निवडणुकांपासून संचार करणाऱ्या डाव्या चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) यांच्यातही ठरल्याच्या चर्चा होत आहेत; परंतु हे डावे पक्ष कॉँगे्रस आघाडी की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीसोबत जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी लढविलेल्या ५३ जागांपैकी अवघ्या एका जागेवर विजय मिळविता आला आणि ती जागा होती नाशिक जिल्ह्यातील कळवण विधानसभा मतदारसंघातील. आता डाव्या चळवळीतील माकपाने आपल्या ताकदीनुसार पाच जागा लढविण्याचे ठरविले असून, निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमधून कोणाचा सांगावा येतो, याची प्रतीक्षा केली जात आहे.देशाच्या राजकारणात डाव्या पक्षांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये या पक्षाने दीर्घकाळ सत्तेची चव चाखली. महाराष्ट्राच्या राजकारणातही भाकप-माकपा या दोन्ही पक्षांनी शिरकाव केलेला आहे. महाराष्टÑ राज्याची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाकपने उमेदवार उभे केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्कीस्ट) अर्थात माकपा १९६७ पासून निवडणुकीला सामोरी गेली. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि चांदवड-देवळा या भागात डाव्या चळवळीचा प्रभाव राहिलेला आहे. नाशिक जिल्ह्यातून १९७८ मध्ये पहिल्यांदा माकपाच्या उमेदवाराला विधानसभेत पाऊल ठेवता आले.२०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असतानाही कळवण-सुरगाणा मतदारसंघातून डाव्यांनी विधानसभेत आपले अस्तित्व जागते ठेवले. २०१४ मध्ये माकपाने राज्यात २० जागा लढविल्या होत्या. त्यांना ०.३९ टक्के मते मिळविता आली होती तर भाकपाने ३३ जागा लढवित ०.१३ टक्के मते घेतली होती.राज्यात पाच जागांची मागणीआता विधानसभा निवडणुकीसाठी माकपाने ५ जागांवर लढण्याची तयारी चालविली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा, नाशिक पश्चिम यासह पालघर, डहाणू या जागांचा समावेश आहे. निवडणुकीत युती-आघाडीचं ठरत असताना डाव्यांनीही वंचित बहुजन आघाडी आणि कॉँग्रेस आघाडी हे दोन पर्याय समोर ठेवले असून त्यापैकी कोण प्रतिसाद देतो, यावरच पार्टीची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.
डावे पक्ष कुणासोबत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:02 AM