नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस गेलेली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले मात्र प्रत्येक जिल्हयात जाउन छोटे व्यापारी, उद्योजकांशी आम्ही संवाद साधला मात्र कुणालाही या पॅकेजची मदत पोहचलेली नाही. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.नाशिक येथे आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. जीएसटीमध्ये सुट न मिळाल्याने व्यापारी वर्ग नाराज आहे. कर संकलन पुर्वीसारखेच आहे. जे २० लाख कोटी कर्ज आहे ते देखील व्याजासकट परत करायचे आहे. कुठल्याही व्यार्पायाला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय मिळाले नसल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे संकट येण्याअगोदरच नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली होती. त्यात आता लॉकडाउनमुळे ज्यांना रोजगार होता अशा १२ कोटी लोकांच्या नोकरया गेल्या असून, अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्थाच ढासाळल्याने नवीन उद्योग येण्यास तयार नाहीत त्यामुळे कंपन्यांमधूनही कामावरून काढले जात आहे. याकरीता आम्ही रोजगार दो आंदोलन छेडले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता खाजगी रूग्णालयांकडून रूग्णांना येणारया अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक शहरात युवक काँग्रेसच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राहुल दिवे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील, नगरसेविकास वत्सलाताई खैरे आदिंसह पदाधिकारी उउपस्थित होते.