नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मौनी अमावास्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरविली असताना सिडको विभागातून मात्र प्रभाग क्रमांक २५ मध्ये हेमंत ईश्वरलाल बिऱ्हाडे या उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भ्रुकुट्या उंचावल्या होत्या. प्रत्यक्षात हेमंत बिऱ्हाडे नावाचा माणूसच अस्तित्वात नसून त्याच्या नावाने डमी अर्ज दाखल करण्याचा प्रताप सिडकोतील निवडणूक कार्यालयातून घडला आहे. प्रात्यक्षिक दाखविताना सदर अर्ज चुकून ‘सबमीट’ झाल्याची सारवासारव आता महापालिका प्रशासनाकडून केली जात असून, अर्ज छाननीच्या वेळी तो आपोआप बाद होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.२७) पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मौनी अमावास्या आल्याने मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची पंचाईत झाली. अमावास्येला कोणतेही शुभकार्य टाळले जाते. त्यामुळे उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल न करणेच पसंत केले. त्यातही आयोगाने आॅनलाइन अर्ज दाखल करणे बंधनकारक केले असल्याने आणि सदर प्रक्रिया ही किचकट मानली जात असल्याने पहिल्या दिवशी झटपट अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे तसे उमेदवारांसाठी अवघडच होते. त्यानुसार, सिडको वगळता अन्य पाचही विभागांत पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये मात्र ‘अ’ गटातून हेमंत ईश्वरलाल बिऱ्हाडे या उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याची नोंद महापालिकेच्या मुख्य निवडणूक कक्षाकडे झाली. पहिल्या दिवशी केवळ एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने आणि तो सुद्धा अमावास्या असतानाही, त्यामुळे सदर उमेदवाराच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली. अमावास्येच्या दिवशी नेमका चंद्र कुठून उगवला, अशाही टिपण्या ऐकायला मिळाल्या. मात्र, या बिऱ्हाडेचा शोध घेतला असता, धक्कादायक माहिती हाती आली. सदर हेमंत बिऱ्हाडे नावाचा माणूसच अस्तित्वात नसून त्याच्या नावाने डमी अर्ज भरला गेल्याचे समोर आले. अधिक खोलवर माहिती घेतली असता, आॅनलाइन अर्ज कसा भरावा आणि तो कसा सादर करावा, याबाबत एका अधिकाऱ्याकडून प्रात्यक्षिक दाखविले जात असताना त्याच्याकडून सदर बनावट नावाने डमी अर्ज भरला आणि दाखल केल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक अधिकाऱ्याचा पासवर्ड वापरून हा प्रकार घडल्याने त्याची नोंद थेट मुख्यालयातील कक्षात झाली आणि कक्षाकडूनही एकमेवअर्ज दाखल झाल्याची नोंद पुढे आयोगाकडे पाठविली गेली. आता सदर डमी उमेदवाराची नोंद कशी वगळायची याबाबत पेच निर्माण झाला असून, त्यासाठी महापालिकेने महाआॅनलाइनशी संपर्क साधला आहे. परंतु, अशी नोंद वगळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने सदर अर्ज आता छाननीच्या वेळीच बाद करावा लागणार आहे. मात्र, सदर प्रकार हा गंभीर मानला जात असून, त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावरही गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
कौन है, हेमंत ईश्वरलाल बिऱ्हाडे?
By admin | Published: January 28, 2017 11:16 PM