नाशिक - घरासमोर महागडी गाडी, दोन मजली पक्के घर, शिवाय मुलेही सरकारी नोकरीत तरीही अनेक लोक रेशनदुकानांसमोर रांगेत उभे असतात. हा प्रकार केवळ नाशिकचाच आहे असे नाही तर कमी अधिक प्रमाणात सर्वत्र असेच चित्र दिसून येते. जिल्ह्यातही अशा प्रकारचे जवळपास ४० टक्के लाभार्थी आहेत. मात्र, त्यांची माहितीच पुरवठा विभागाला नसते आणि मग केवळ चर्चाच होते.
पात्र लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ मिळावा, गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहोचावे यासाठी स्वस्त दरात धान्य पुरवठा योजना राज्य शासनाकडून राबविली जाते. केंद्राकडूनही मोफत धान्य दिले जाते. ही एक महत्त्वाकांक्षी योजना सर्वांना लाभदायी अशीच आहे. चुकीची आणि खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेणारे लोक शोधून काढण्याचे काम यंत्रणेचे आहे. मात्र, अशा प्रकारची मोहीम राबविली जात नसल्याने रेशनचा सुरू असलेला पुरवठा अजूनही सुरूच आहे.
रेशनचे धान्य किती कुणाला?
अंत्योदय : या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब ३५ किलो रेशन मिळते, ज्यामध्ये २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ असतो. लाभार्थींना गहू २ रुपये किलो दराने आणि तांदूळ ३ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
दारिद्र्य रेषेखालील : दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला १० ते २० किलो रेशन दिले जाते. बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी दराने मिळते.
प्राधान्यक्रम कार्ड : प्राधान्य घरगुती शिधापत्रिकेवर दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ तीन रुपये किलो आणि गहू दोन रुपये किलो दराने दिला जातो.
अनेकांचे ४५ ते ५९ हजारांपर्यंतच वार्षिक उत्पन्न?
रेशनवरील धान्य घेणाऱ्या अनेकांचे वार्षिक उत्पन्न हे अवघे ४५ ते ५९ हजारांपर्यंतच असल्याची अनेक कार्डधारक आहेत. त्यांच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहिले तर त्यांचे वार्षिक उत्पन्न खरेच इतके कमी असेल का? असा प्रश्न कुणालाही पडावा असेच आहे. परंतु, याबाबत तपासणी होतच नाही.