नाशिक : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी २००९ ते २०१४ दरम्यान केलेल्या भ्रष्टाचारातील पैसा कोलकाता आणि मुंबईच्या बोगस कंपन्यांमध्ये वळवून तो चार कंपन्यांद्वारे पांढरा करून घेण्याच्या गैरव्यवहारप्रकरणी आयकर विभागाने भुजबळ यांची १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याप्रकरणी भुजबळ यांची राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, तसेच बेनामी मालमत्ता घोषित केलेल्या सांताक्रुझच्या ला पेटीट या नऊ मजली इमारतीची मालकी कुणाची याचा तपास मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या इमारतीत भुजबळ राहतात, त्याच्याशी भुजबळ यांचा काय संबंध आहे, हे त्यांनी स्वत: घोषित करून दाखवावे, असे आव्हानदेखील सोमय्या यांनी दिले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी भुजबळांनी सर्व आर्थिक गैरव्यवहार हे शेल अर्थात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून केले असल्याचे नमूद केले. जिथे कुणी ९ फूट जागा देत नाही, तिथे सांताक्रुझला ला पेटीट ही ९ मजली इमारत कुणाच्या नावाची आहे, त्याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वत:च करावा. अन्यथा मी शनिवारी त्या इमारतीची पाहणी करण्यास जाणार असल्याचेही सोमय्या यांनी नमूद केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. ते तर टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनच्या हिमतीशिवाय काही होऊच शकत नाही. ठाकरे यांनी तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच्या २४ तासांतच एका जमिनीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणीदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
इन्फो
चार कंपन्यांच्या नावे रक्कम
भुजबळ परिवाराच्या पनवेल तालुक्यातील देविशा इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे ६६ कोटी ९० लाख, सांताक्रुझ येथील मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शनचे ७ कोटी ७२ लाख, अंधेरीतील १७ कोटी २४ लाख तसेच आर्मस्ट्रँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये १७ कोटी ८२ लाखांची रक्कम शेल कंपन्यांच्या माध्यमातून जमा करण्यात आल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केल्याचेही सोमय्या यांनी नमूद केले.
इन्फो
असे केले गैरव्यवहार
संबंधित चार कंपन्यांमध्ये काही व्यवसाय केलेले नसतानाही या कंपन्यांचे १०० रुपयांचे शेअर्स कोलकाताच्या शेल कंपन्यांनी १० हजार रुपयांच्या भावाने विकत घेतले. त्याबदल्यात भुजबळ यांनी संबंधित एजंटना रोख रक्कम दिल्यानंतर त्या एजंटनी शेल कंपन्यांच्या चेकद्वारे कोट्यवधी रुपये भुजबळ परिवाराच्या नावावरील ४ कंपन्यांना दिले. या चेकद्वारे एजंटनी भुजबळ परिवाराला ११० कोटी रुपये व्हाईट करून दिल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याचा दावादेखील साेमय्या यांनी केला.
इन्फो
आता बारावा नंबर
ठाकरे सरकारमधील ११ जणांच्या विरोधात पुराव्यानिशी कागदपत्रे दिल्यामुळेच सुनावणी आणि कारवाईच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या विरोधात म्हाडा, एसआरएबाबतची कागदपत्रे गोळा करण्यात आली असून, यापुढील बारावा क्रमांक आव्हाडांचा लागणार असल्याचेही सोमय्या यांनी नमूद केले. माझ्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असत्या तर ५५ लाख रुपये संजय राऊत यांना परत का करावे लागले ? नार्वेकर यांना त्यांचा चिपळूणमधील बंगला का तोडावा लागला ? असा सवालदेखील सोमय्या यांनी उपस्थित केला.