नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक कॉँग्रेस व राष्टवादी एकत्र लढण्यावर दिल्ली मुक्कामी शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी, जागावाटप अद्याप झालेले नाही. गेल्या निवडणुकीत राष्टवादीकडून छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला नाशिक लोकसभेच्या जागेवर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने यंदा या जागेवर कॉँगे्रसने दावा सांगितलेला असताना राष्टÑवादी कॉँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसला सोडण्यात आले होते. कॉँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात राष्टवादीचा प्रचार केला असला तरी, मोदी लाटेपुढे दोन्ही जागांवर साफ पराभव राष्टवादीला पत्करावा लागला. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने साहजिकच दोन्ही कॉँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर दावा सांगितला जात असला तरी, या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कॉँग्रेसकडून सुरू झालेल्या तयारीत जागा ताब्यात ठेवण्याबाबत चर्चा केली जात आहे. कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्टतील पदाधिका-यांच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षासाठी सोडण्यात याव्यात असा दबाव स्थानिक पदाधिकाºयांनी टाकण्यास सुरुवात केली असून, त्यातही नाशिकची जागा राष्टवादीकडून छगन भुजबळच लढविणार असतील तरच ती सोडण्यात यावी अन्यथा कॉँग्रेसने ही जागा लढवावी, अशी भुजबळ यांना पेचात टाकणारी भूमिका घेतली आहे. तथापि, राष्टवादीकडून अद्याप नाशिकची जागा कोण लढविणार हे निश्चित झालेले नाही, मात्र भुजबळ यांच्या परिवारातच उमेदवारी जाण्याची शक्यता अधिक आहे, त्यातही छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ हेच उमेदवार असतील असे राष्टÑवादीच्या एका गटाचे म्हणणे आहे व त्यासाठी विजयाचे गणिते मांडण्याची घाईदेखील केली जात आहे. राज्यातील जागा लढविण्यावर दोन्ही कॉँग्रेसमध्ये एकमत झाले, पण जागावाटप झालेले नाही. असे असताना समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक लोकसभा मतदारसंघात गट, गणनिहाय बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे ते पाहता, राष्टवादीची लगीनघाई कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात जिल्हाध्यक्षांच्या अधिकारात एकमेकांकडून हस्तक्षेप होत असल्यावरून पक्षात नाराजी असताना त्यात निवडणुकीच्या घाईने भर पडली आहे.