नाशिक शहरात फलकबाजी नवीन नाही. स्वच्छ शहर सुंदर शहर अशी घोषणा देणारे राजकीय पक्ष आणि महापालिकेत ट्रस्टी म्हणून निवडून गेलेले नगरसेवकच यासंदर्भात शहर विद्रुपीकरणाला हातभार लावत असतात. राजकीय फलकांमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय तणावाबरोबरच हत्या देखील झाल्या आहेत; मात्र त्यानंतर देखील महापालिकेला ठोस कारवाई करता आलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात फलक लावू नये यासाठी महापालिकेने विभागनिहाय नागरी पथके तयार करून त्यांचे फोन नंबर देखील दिले तसेच फौजदारी कारवाई देखील केल्या आहेत; मात्र कारवाईत सातत्य नसल्याने महापालिकाच पक्षीय भेद करीत असल्याचे आरोप केले जात असल्याने शहरात मोक्याच्या ठिकाणी अशाप्रकारचे फलक लावणे सुरूच आहे.
इन्फो....
या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?
- नाशिक शहरात सीबीएस, अशोकस्तंभ, टिळकपथ, गंजमाळ, शालीमार तसेच रविवार कारंजा परिसर फलकबाजीसाठी परिचित असून तेथे कोणाचाही अटकाव नाही.
- पंचवटी कारंजा, आडगाव नाका, काट्या मारोती चौक, आडगाव नाका या भागात तर सिडकोत चौकाचौकात फलक लावलेले असतात.
- नाशिकरोड येथील बिटको चौक, मुक्तीधाम, सिडकोत त्रिमूर्ती चौक, पवन नगर, सातपूर विभागात सातपूर गाव, अशोक नगर, देवी मंदिर चौकात असे फलक लावलेले असतात.
इन्फो...
वर्षभरात अपवादानेच कारवाई
- महापालिकेकडून फलक हटवण्याची कार्यवाही केली जाते. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्या तुलनेत कोठेही फलक लागले नव्हते आणि राजकीय कार्यक्रम ठप्प हाेते. मात्र, आता पुन्हा फलक वाढू लागले आहेत.
- महापालिकेकडून कारवाई होते परंतु साधारणत: तक्रार आल्यानंतरच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये येते. ऑनलाईन ॲपवरील तक्रारींची प्रामुख्याने दखल घेतली जाते.
- पंचवटीसह दोन ते तीन ठिकाणी गेल्या तीन महिन्यात थेट पोलीस ठाण्यात महापालिकेने तक्रारी दाखल केल्या आहेत.
इन्फो...
काय होऊ शकते कारवाई?
- विनापरवाना फलक असेल तर महापालिका तो तत्काळ हटवू शकते.
- महापालिकेने ठरवले तर काही प्रकरणात प्रशासन संबंधित फलकबाजावर फौजदारी कारवाई देखील करू शकते.
- महापालिका नियमित शुल्काबरोबरच दंडात्मक कारवाई करू शकते.
कोट..
अधिकारी म्हणतात...
विनापरवाना उभारलेले फलक अनेकदा वाहतुकीला अडथळा ठरणारे असतात. महापालिकेच्या वतीने अशा फलकांवर त्वरित कारवाई केली जाते. सध्या सहाही विभागात महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमार्फत प्रशासन कारवाई करीत आहे.
- प्रदीप चौधरी उपआयुक्त, विविध कर वसुली विभाग