पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अनेक जनावरांच्या पायांची खुरे वाढल्याने त्यांना चालतांना वेदनादायी प्रवास करत अन्न-पाणी शोधावे लागत असून, ‘मुक्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळणार’, असा प्रश्न पिंपळगावकरांना पडला आहे. शहरातील बस स्थानक व आजूबाजूच्या परिसरात प्रवासी व इतर लोकांची नेहमीच वर्दळ असते. तर काही मोकाट जनावरांचीही गर्दी दिसून येते. त्यातीलच एक लाल-भुरक्या रंगाची गाय अतिशय अवघड स्थितीत जीवन जगत असल्याचे दिसते. अनेक दिवसांपासून या गायीच्या चारही पायांच्या खुरांची असामान्य वाढ झालेली आहे. त्यामुळे तिला चालणे मुश्किल होत आहे. याशिवाय उदरनिर्वाहासाठी चारा शोधताना इतर जनावरांबरोबर स्पर्धा करत तिला वेदनादायी कसरत करावी लागत आहे. या गाईच्या चारही खुरांची झालेली अतिरिक्त वाढ तिच्यासाठी वेदनादायी ठरत आहे. त्यामुळे प्राणिमित्रांकडून तिच्या वाढलेल्या खुरांवर उपचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, येथील ग्रामपंचायत प्रशासनाचे मोकाट जनावरांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने प्राण्यांच्या जीवनमरणाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन या गाईला चालता येईल व चारा मिळविता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून आळवला जात आहे. तर पशुसंवर्धन विभाग अथवा संबंधित यंत्रणेने मोकाट जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवून त्यांचे जगणे सुलभ करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुक्या हुंदक्याचे ‘चालणे’ कुणाला कळावे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 2:41 PM